
ब्रेक निकम झालेल्या ट्रकचे दोन वाहनांना धडक ; महामार्गावरील कशेडी घाटातील घटना ; चालक केबिनमध्ये अडकला, अथक प्रयत्नांती चालकाला बाहेर काढण्यात यश
खेड (वार्ताह) मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात ब्रेक निकामी झालेल्या ट्रकने मारुती कार आणि टँकरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला. टँकरला धडक दिल्याने ट्रकची चालक केबिन चेपल्याने चालक केबिनमध्येच अडकून पडला. महामार्गावरून प्रवास करणारे अन्य वाहन चालक आणि पोलिसांनी महत्प्रयासाने अडकलेल्या चालकाला बाहेर कडून रुग्णालयात दाखल केले. हा अपघात शनिवार दिनांक ८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई दिशेकडून गोवा दिशेकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकचे ब्रेक कशेडी घाट उतरताना ब्रेक निकामी झाले. चालकाने आपले सारे कौशल्य पणाला लावून ट्रक नियंत्रित करण्याच्या प्रयत्न केला मात्र उतारावर वेगात असणारा ट्रक नियंत्रित न होऊ शकल्याने त्या ट्रकने आपल्या पुढे असलेल्या मारुती डिझायर कार आणि टँकरला धडक दिली. या अपघातात टँकरला धडक देणाऱ्या ट्रकची चालक केबिन पूर्णपणे चेपली गेल्याने, चालक ब्रेक पायडल आणि स्टिअरिंग मध्ये अडकून पडला. वेदनेने विव्हळणाऱ्या चालकाला महामार्गावरून धावणाऱ्या अन्य वाहनांच्या चालकांनी आणि पोलिसानी महत्प्रयासानी बाहेर काढून उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले.
मुंबई गोवा महामार्गावरील अपघातांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. कशेडी घाट उतरताना तर चालकांच्या ड्रायविंग स्किलची कसोटी लागत आहे मात्र तरीही कधी गाडीचे ब्रेक निकामी होऊन तर कधी धोकादायक वळणावर वाहन पलटी होऊन अपघात होत आहे. आतापर्यंत कशेडी घाटात अनेक जीवघेणे अपघात होऊन अनेकांचा बळी गेला आहे तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. मात्र अपघातांच्या संख्येत घट होत नसल्याने हा घाट वाहतुकीसाठी अतिशय धोकादायक झाला आहे.
महामार्गावरील नागमोडी आणि अवघड कशेडी घाटाला पर्याय म्हणून कशेडी घाटात भुयारी मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. २०२१ च्या मार्च अखेर हे काम पूर्ण होणार होते मात्र २०२३ उजाडला तरी अद्याप भुयारी मार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. कशेडी घाटात दर दोन दिवसांआड होणारे जीवघेणे अपघात लक्षात घेता भुयारी मार्गाचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी होत आहे.
www.konkantoday.com