
राजापूर शहराच्या गाळमुक्त अभियानासाठी डॉक्टर असोसिएशनचा पुढाकार
राजापूर : शहरातील नदीच्या गाळमुक्त अभियानासाठी राजापूर डॉक्टर असोसिएशन यांच्याकडून एक लाख एक हजार ९५५ रूपयांचा मदतनिधी जमा करण्यात आला असून या रकमेचा धनादेश राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला .राजापूर नगर परिषद, महसूल प्रशासन, नाम फाऊंडेशन व लोकसहभागातून शहरातील अर्जुना नदीपात्रातील गाळ उपसा अभियान राबविले जात आहे.
या अभियानाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असून मोठा लोकसहभाग मिळत आहे. आपला वैद्यकीय व्यवसाय करताना विविध माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या राजापूर डॉक्टर्स असोसिएशनने या मोलाच्या कार्यात आपला महत्वपुर्ण वाटा उचलला आहे. या कामासाठी १ लाख १ हजार ९५५ रूपयांचा मदतनिधी उभारण्यात आला आहे. ही रक्क्म राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा गाळ निर्मूलन समिती सचिव प्रशांत भोसले यांच्याकडे डॉक्टर्स असोसिएशनचे सदस्य डॉ. उत्तम प्रभुदेसाई, डॉ. सुनील मांडवकर, डॉ. सुयोग परांजपे, डॉ. अभय अळवणी यांनी सुपूर्द केली.