
रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर आलेल्या 4 अल्पवयीन मुलांची रवानगी ‘चाईल्ड लाईन’मध्ये
रत्नागिरी : रेल्वेस्टेशनवर आलेल्या परराज्यातील एकूण 4 अल्पवयीन मुलांना रेल्वे पोलिसांनी ‘चाईल्ड लाईन’या संस्थेच्या ताब्यात दिले. बाल कल्याण समितीमधील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
अभ्यासाचा कंटाळा आल्याने शनिवारी सकाळी यातील दोन मुले ही छोटे उदयी सवाई माधोपूर, राजस्थान येथून कनिष्ठ महाविद्यालयातून कोणालाही न सांगता परस्पर रेल्वेने प्रथम दिल्लीला गेली. तेथून ती राजधानी एक्सप्रेसने रत्नागिरीत आली असता त्यांच्याकडे तिकीट नसल्याने रेल्वे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी सर्व प्रकार त्यांना सांगितला. पोलिसांनी याबाबत मुलांच्या पालकांशी संपर्क साधला असता आपली मुले बेपत्ता झाल्याबाबत त्यांनी तेथील पोलिस ठाण्यात खबर दिली असल्याचे सांगितले.
शनिवारी दुपारच्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर पोलिसांना अन्य दोन अल्पवयीन मुले आढळून आली. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता ती मुले दिल्लीतून गोव्याला फिरण्यासाठी आली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान रेल्वे पोलिसांनी त्यांच्याही पालकांशी संपर्क साधलेला असून सध्या त्यांची रवानगीही चाईल्ड लाईनच्या शेल्टर होममध्ये करण्यात आलेली आहे.