
लोटे-परशुराम येथील गोशाळा पाडण्याचे आदेश
खेड : लोटे-परशुराम येथील अनधिकृत गोशाळा पाडण्याचे आदेश महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सुविधा उपविभागाच्या उपअभियत्यांनी दिले आहेत. याबाबत अध्यक्ष भगवान कोकरे यांना लेखी पत्रही दिले आहे. एमआयडीसीचे रत्नागिरी प्रादेशिक अधिकारी यांनी गोशाळेच्या जागेची पाहणी केली असता प्रथमदर्शनी ही जागा महामंडळाची दिसून आली आहे. तर या भूखंडावर अतिक्रमण झाले असून लोटे एमआयडीसीच्या भूखंडावरील अनधिकृत बांधकाम आठ दिवसाच्या आत स्वखर्चाने व जबाबदारीने काढून टाकावे. अन्यथा आपल्यावर नाईलाजास्तव कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे देखील या पत्रात नमूद करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून भगवान कोकरे यांच्या श्री संत ज्ञानेश्वर माउली जीवन मुक्तिधाम सेवा संस्थानच्या माध्यमातून लोटे औद्योगिक वसाहतीमधील भूखंडावर गोशाळा चालवली जात आहे. गोशाळेबाबत तक्रारी होत आहेत. यामध्ये सोनगावसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी गोशाळेबाबत तक्रार करताना या गो शाळेचा त्रास होत असल्याचे नमूद करत ही गोशाळा बंद करण्याची मागणी केली होती. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तर या गोशाळेचे भगवान कोकरे यांनी गोशाळा अधिकृत की अनधिकृत हे शासन ठरवेल असे सांगताना आपण त्यासाठी सहकार्य करू, असे स्पष्ट केले होते.