
चिपळुणात महिला राष्ट्रवादीकडून निशिकांत भोजनेंच्या वक्तव्याचा निषेध
चिपळूण : गतवर्षीच्या चिपळुणातील महापुरानंतर महापुराची कारणे शोधण्यासाठी प्रशासनामार्फत अभियंता दीपक मोडक यांची नियुक्ती झाली. अभ्यास गटाचे प्रमुख म्हणून त्यामध्ये चिपळूणमधील बचाव समितीचे दोन सदस्य घेतले गेले व अहवाल तयार केला गेला. परंतु माजी उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने यांनी जावई शोध लावून बचाव समिती व आमदार शेखर निकम यांनी दबाव आणला, अभ्यास गटाची चौकशी करावी, असे वक्तव्य केले. या वक्तव्याचा शहर व जिल्हा महिला राष्ट्रवादीच्यावतीने निषेध करण्यात आला आहे. प्रत्यक्षात पुरानंतर चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून सातत्याने शासनाचा पाठपुरावा करीत तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री यांच्याकडून प्रशासनामार्फत कोणावरही राजकीय दबाव न आणता सर्व पक्षांना बरोबर घेऊन नदीतील गाळ काढण्यासाठी आवश्यक ती साधनसामुग्री मिळवून दिली. चिपळूण पूरमुक्त करून चिपळुणातील नागरिक आणि व्यावसायिकांचे जीवन पूर्ववत करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. त्यासाठी चिपळूण बचाव समितीचे देखील सहकार्य घेतले आणि अशा लोकप्रतिनिधींची सीआयडीमार्फत चौकशी होण्याची मागणी भोजने यांनी केली आहे. महिला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने या मागणीचा जाहीर निषेध करीत आहोत, अशी प्रतिक्रिया जिल्हा राष्ट्रवादीच्या अध्यक्षा चित्रा चव्हाण यांनी दिली आहे.