
येत्या चोवीस तासात रत्नागिरी जिल्ह्यात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता
येत्या 24 तासात जिल्ह्यात विजेच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार वादळी पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला असून रेड अॅलर्ट जारी केला आहे.
बुधवारी संध्याकाळी विजांच्या गडगडाटात काही भागात जोरदार पाऊस झाला. दिवसभरात रत्नागिरी जिल्ह्यात 16.48 मि.मी.च्या सरासरीने 148.30 मि.मी. एकूण पावसाची नोंद झाली. यामध्ये खेड, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तर लांजा, राजापूर, मंडणगड तालुक्यात 10 ते 15 मि. मी. पावसाची नोंद झाली. शुक्रवारी मुसळधार पावसाचा रेड अॅलर्ट जारी केला असल्याने प्रशासनाने किनारी भागासह दुर्गम भागात सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत. सणाचे दिवस असल्याने संभाव्य नैसर्गिक आपत्तीसह दुर्घटना घडू नये, यासाठी आपत्ती निवारण पथकांना विशेषतः नदी आणि सागरी किनार्यांवर सज्जतेच्या सूचना केल्या आहेत.