
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला शासन नव्हे तर ठेकेदार जबाबदार : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण विलंबाला शासन जबाबदार नसून त्या-त्या ठिकाणच्या ठेकेदारांनी कामाचा खोळंबा केला आहे. त्यामुळे न्यायालयीन लढा सुरू आहे. याचा परिणाम महामार्गाच्या कामावर झाला. डिसेंबर 2023 पर्यंत चौपदरीकरण पूर्ण केले जाईल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी चिपळूण येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खड्डे भरणे सुरू आहे. त्यासाठी दहा कि. मी. च्या अंतरावर अभियंत्यांची नेमणूक झाली आहे, असेही ना. चव्हाण म्हणाले. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. शुक्रवारी सायंकाळी कापसाळ येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. सर्वांनी चौपदरीकरण पूर्ण होण्यासाठी सहकार्य करा, आपण केंद्र व राज्य शासनाचा समन्वयक म्हणून ज्या मागण्या होतील त्या पूर्ण करू असे शेवटी सांगितले.