भोवडे येथे गोठ्यात कुजलेल्या अवस्थेत आढळला बिबट्या

संगमेश्वर : तालुक्यातील भोवडे येथील विनायक बोबडे यांच्या पडिक गोठ्यात कुजलेल्या अवस्थेत बिबट्या सोमवारी आढळून आला. या बिबट्याचा उपासमारीने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
याबाबत देवरूख वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, भोवडे येथील जीवन गणपत रवांदे हे त्यांच्या मालकीची गुरे ‘अंबाबन’ याठिकाणी चरायला घेऊन गेले होते. परत येतेवेळी वाडीच्या पूर्वेस सुमारे १ कि. मी अंतरावर त्यांना काहीतरी कुजल्यासारखा वास आला. यानंतर त्यांनी वास कुठून येत आहे, याचा अंदाज घेऊन ते पुढे गेले असता गावातील विनायक गणपत बोबडे यांच्या गोठ्यातून वास येत असल्याचे लक्षात आले. जरा पुढे जाऊन डोकावून पाहिले असता गोठ्यात बिबट्या मृतावस्थेत दिसून आला. तो पूर्ण कुजलेल्या स्थितीत होता. यानंतर त्यांनी सदरची बाब गावचे पोलिस पाटील प्रदीप अडबल व ग्रामस्थ यांना कळवली. याची महिती देवरूख वनविभागाला देण्यात आली. यानंतर विभागीय वनाअधिकारी दीपक खाडे, विभागीय वनाअधिकारी स्नेहलता पाटील, सचिन निलख व परिक्षेत्र वनाअधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूखचे परिमंडल वनाअधिकारी तौफिक मुल्ला, सर्वश्री वनरक्षक सूरज तेली, आर. डी. पाटील, संजय रणधीर यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याची पाहणी करून सर्व अवयव शाबूत असल्याची खात्री केली व पंचनामा केला. यानंतर पशुवैद्यकिय अधिकारी कदम व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मृत बिबट्यावर वनविभागामार्फत अंत्यसंस्कार करण्यात आले. हा बिबट्या नर जातीचा असून तो बरेच उपाशी असल्याने त्याचा भूकेने व्याकुळ होऊन मृत्यु झाला असावा, असे वनविभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, अशा प्रकारच्या घटना आपल्या परिसरात घडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ या क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन वनविभागातर्फे प्रकाश सुतार-वनक्षेत्रपाल यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button