
चिपळूण, राजापूर लांजावर पुरुषांचे वर्चस्व, तर रत्नागिरी, खेड, दापोली, संगमेश्वरवर महिलांचे वर्चस्व दिसणार
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या गुरुवारी झालेल्या आरक्षण सोडतीत अनुसुचित जातीमध्ये आसगे, भडगाव तर अनुसूचित जमातीमध्ये सुकिवली गट स्त्रीसाठी आणि अनुसूचित जातीमध्ये गव्हाणे गट राखीव झाला आहे. सर्वसाधारण स्त्री गटाचे आरक्षण काढताना मात्र प्रशासनाचा सावळागोंधळ दिसून आला. दोन गटात सर्वसाधारण स्त्रीसाठी काढलेल्या आरक्षणाला आक्षेप घेतल्यानंतर येथील आरक्षण बदलण्यात आले. विशेषत: चिपळूण, राजापूर व लांजा तालुक्यात पुरुषांचे तर रत्नागिरी, खेड, दापोली, संगमेश्वर तालुक्यावर महिलांचे वर्चस्व दिसून येणार आहे. अनेक प्रस्थापितांचे गट आरक्षित झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.
नव्या आरक्षणामुळे मावळत्या जिल्हा परिषदेमध्ये असलेल्या अनेक महिला, पुरूष सदस्यांना घरीच बसावे लागणार आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 62 जागांसाठी गुरुवारी स्वा. सावरकर नाट्यगृहात सोडत झाली. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवडणूक अधिकारी तेजस्विनी पाटील यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पूजा पाष्टे या छोट्या मुलीने आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढल्या. निवडणूक विभागाकडून आलेल्या सूचनांनुसार आरक्षण जाहीर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.
आरक्षणाच्या सुरुवातीलाच अनुसूचित जाती व जमातीसाठी आरक्षण काढण्यात आले. यात अनुसूचित जातीसाठी तीन गट आरक्षित करण्यात आले. यामध्ये लांजा तालुक्यातील आसगे व गव्हाणे तर खेड तालुक्यातील भडगाव गटाचा समावेश आहे. त्यानंतर आसगे व भडगाव गट स्त्रीसाठी राखीव झाले आहेत. अनुसूचित जमातीसाठी खेड तालुक्यातील सुकिवली गट आरक्षित झाला आहे.
मंडणगड तालुक्यातील तीनही गट नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे सर्वसाधारण गटातील राजकीय पदाधिकार्यांचा मात्र हिरमोड झाला आहे. दापोली तालुक्यातील सातपैकी पाच गटात महिला राखीव झाले असून, यात चार सर्वसाधारण तर एक ‘नामाप्र’वर्गाचा समावेश आहे. खेडमध्येही सातपैकी पाच प्रवर्ग हे महिला राखीव झाले आहेत. यातही सर्वसाधारणच्या चार गटांपैकी तीन गट महिला राखीव झाल्याने अनेक पदाधिकार्यांचे मनसुबे उधळले आहेत. याठिकाणी महिला शक्तीला मोठा वाव मिळाला आहे. गुहागरमध्ये पाचपैकी तीन गटांवर महिलांचेच वर्चस्व आहे. चिपळूण तालुक्यातील दहा गट सर्वसाधारण झाले असून, यातील एक गट महिलांसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे चिपळुणात पुरूष पदाधिकार्यांमध्ये निवडणुकीच्यावेळी सर्वच राजकीय पक्षात उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच होताना दिसणार आहे.
संगमेश्वर तालुक्यात आठ गटांपैकी तीन गट ‘नामाप्र’ वर्ग तर पाच गट सर्वसाधारण झाले असून, यातील पाच गटांवर महिलांचे आरक्षण पडले आहे. संगमेश्वरमध्ये अनेकांच्या मनसुब्यांना सुरुंग लागला आहे. रत्नागिरीमध्ये अकरा गटांपैकी सात गटांवर महिलांचे वर्चस्व राहणार असून, इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. सर्वसाधारण गटातून इच्छुक असणार्यांना करबुडे, हातखंबा, खेडशी, झाडगाव, खालगाव हे गट ‘नामाप्र’ झाल्याने अन्य गटात शोधाशोध करताना झगडावे लागणार आहे. रत्नागिरीत गोळप व कुवारबाव हे दोनच गट सर्वसाधारण झाल्याने या दोन गटांकडे आता लक्ष लागले आहे.
लांजा तालुक्यात अनुसूचित जातीसाठी दोन तर सर्वसाधारणसाठी दोन गटांमध्ये आरक्षण पडले आहे. यातील अनुसूचित जातीमधील एक गट महिला राखीव झाला आहे. राजापूरमध्येही सातपैकी तीन गटांमध्ये महिला आरक्षण पडले आहे. यात तीन गट खुले झाले असून, एक नागरिकांचा मागास प्रवर्ग झाला आहे.
जिल्ह्यात सर्वसाधारणसाठी 22 गट, महिला सर्वसाधारणसाठी 20 गट, ना.मा.प्र महिलांसाठी 8 तर ना.मा.प्र.साठी 8 गटांचे आरक्षण पडले आहे. अनुुसूचित जातीसाठी तीन गटांचे आरक्षण पडले असून त्यातील दोन गट महिला राखीव झाले आहे, तर अनुसूचित जमातीसाठी एकमेव गट महिला राखीव झाला आहे.