
बनावट दागिन्याद्वारे फसवणूक : दोन महिलांना पोलिस कोठडी
रत्नागिरी : शहरानजीकच्या एमआयडीसी येथील बँक ऑफ इंडियामध्ये बनावट दागिने ठेवून संगनमताने बँकेची सुमारे 49 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केली. यातील 10 संशयितांपैकी अन्य दोन संशयित महिलांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून सोमवारी न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
नमिता दिगंबर इंदुलकर (50, मूळ रा. राजापूर सध्या रा. कोकणनगर, रत्नागिरी) आणि तबन्ना सिध्दप्पा बसनाल (मूळ रा. विजापूर सध्या रा. कोकणनगर, रत्नागिरी) अशी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या अन्य दोन संशयितांची नावे आहेत. यापूर्वी बँकेतील सुवर्णकार प्रदीप श्रीपाद सागवेकर (वय 51, रा. किर्तीनगर, रत्नागिरी), आकाशानी जनार्दन कांबळे (50), शुभम जनार्दन कांबळे (24, दोन्ही रा. रविंद्रनगर कारवांचीवाडी, रत्नागिरी), जयवंत सखाराम मयेकर (वय 49, रा. पोमेंडी बुद्रुक मयेकरवाडी, रत्नागिरी) यांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून शुक्रवारी त्यांना 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील 6 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली असून अन्य 4 जणांचा पोलिस शोध घेत आहेत.



