
रत्नागिरी मनोरुग्णालयाचा कारभार होणार हायटेक
रत्नागिरी : रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयाचा कारभार अधिक पारदर्शक आणि हायटेक करण्याच्या उद्देशाने वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमोद गडीकर यांनी प्रयत्न सुरु केले आहे. रत्नागिरी मनोरुग्णालय आता ई हॉस्पिटल होणार आहे. मनोरुग्णालयातील प्रत्येक वार्ड आणि वैद्यकीय कक्ष हा संगणक इंटरनेट प्रणालीशी जोडला जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.
रत्नागिरी मनोरुग्णालयात वर्षभर विविध उपक्रम सुरु असतात. कोरोना काळात विशेष म्हणजे रुग्णांचे लसीकरण 100 टक्के पूर्ण करुन चांगली कामगिरी करण्यात आली. जवळपास 200 मनोरुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांच्या आजाराच्या स्वरुपानुसार वार्ड तयार करण्यात आले आहे. रुग्णांना उपचारासाठी दाखल करुन घेण्याआधी मानसोपचार तज्ज्ञांकडून रुग्ण तपासणी व माहिती घेतली जाते. आतापर्यंत ही सर्व माहिती ऑफलाईन म्हणजे कागदोपत्री असायची आता ती माहिती संगणकीकृत केली जात आहे. एखाद्या रुग्णाचा आयडी क्रमांक टाकला की, त्याची संपूर्ण माहिती संगणकावर डॉक्टर व तसेच परिचारिकेला लगेच उपलब्ध होते. फाईल शोधत बसावी लागत नाहीत. अशाच प्रकारे 200 रुग्णांचा डेटा अपलोड करुन डॉक्टरांना त्वरित त्याची माहिती उपलब्ध होणार आहे. वैद्यकीय अधीक्षक यांना रुग्णांबाबत काही शंका असेल तर त्यांच्या दालनात बसून ई प्रणालीव्दारे वॉर्डमधील परिचारिका , डॉक्टर यांच्याशी संवाद साधून माहिती घेता येणार आहे. कोणत्या वार्ड किती रुग्ण आहेत, ड्युटीवर कोण आहे ही सगळी माहिती एका क्लिकवर पाहता येणार आहे. लवकरच हे मनोरुग्णालय ई हॉस्पीटल होणार असल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.