
उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नीच्या बदनामीप्रकरणी पोलिसांकडे तक्रार
राजापूर : विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा मुलाखत देतानाचा एक फोटो व्हॉटस्अॅप ग्रुपवर व्हायरल करण्यात आला असून त्या फोटोखाली बदनामीकारक अशा मजकुराचा उल्लेख करण्यात आला आहे. ही घटना राजापूर तालुक्यात घडली असून बदनामी करणार्याविरूद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीचे रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) संयोजक अनिलकुमार करंगुटकर यांनी पोलिस निरीक्षकांकडे पत्राद्वारे केली आहे. ‘राजापूरचे मावळे’ या व्हॉटस् अॅप ग्रुपवर दि. 9 जुलै 2022 रोजी रात्री 10.18 वाजता हा मेसेज सेंड करण्यात आला. याबाबतचे पुरावेही त्यांनी या पत्रासोबत जोडले असून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.