
जिल्ह्यातील 26 बालकांना गंभीर आजार; जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया
रत्नागिरी : आरोग्य तपासणीत जिल्ह्यातील 26 बालकांमध्ये गंभीर आजार सापडले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नव्हता. या बालकांवर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी व सायन हॉस्पिटल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे न थकता सलग 11 तास या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
शिबिरामध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाकडील पथकामार्फत हर्निया, हायड्रोसिल, जननेंद्रियाचे आजार व इतर आजाराने शस्त्रक्रियेस पात्र एकूण 26 मुलांवर महात्मा फुले जनआरोग्य योजना व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून तपासणी – उपचार-शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
शिबिरामध्ये डॉ. पारस कोठारी, हेड ऑफ दि डिपार्टमेंट सायन हॉस्पिटल मुंबई यांच्यामार्फत 0 ते 18 वयोगटातील 3 गंभीर शस्त्रक्रिया, हर्निया दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, हायड्रोसिल तसेच जननेंद्रियाचे शस्त्रक्रिया अशा प्रकारे एकूण 26 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रियागृहामध्ये सकाळी 8 ते रात्री 11 असे सलग 11 तास न थकता डॉ. कोठारी व त्यांचे सहकारी स्टाफ तसेच जिल्हा रुग्णालयाकडील वैद्यकिय अधिकारी व स्टाफ यांनी मोलाचे योगदान दिले.
शिबिराकरीता डॉ. एस. के. फुले-गावडे, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय रत्नागिरी, डॉ. विकास कुमरे अति. जिल्हा शल्यचिकित्सक, यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिबिर यशस्वीतेकरीता डॉ. ज्ञानेश विटेकर, डॉ. गुरव, डॉ. घोसाळकर, डॉ. मंगला डॉ. सपाटे, डॉ. प्रांजली घोसाळकर, शस्त्रक्रिया विभागातील सर्व स्टाफ, रुग्णालयीन स्टाफ तसेच डॉ. नेहा विटेकर व आरती कदम, जिल्हा कार्यक्रम समन्वयक यांचे मोलाचे योगदान लाभले.