बंडखोर आमदार योगेश कदम समर्थकांची पदावरून उचलबांगडी, उत्तर रत्नागिरीतील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना हटवले

दापोली : ना. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला पाठिंबा देणाऱ्या दापोलीचे आमदार योगेश कदम यांच्या कार्यकर्त्यांना पदावरून हटवून नवीन नियुक्त्या केल्या जात आहे. बंडाचे धुमशान सुरू असताना दापोलीत याचे पडसाद उमटू लागले आहेत. दापोलीचे शहर युवा अधिकारी स्वप्नील पारकर यांना हटवून त्यांच्या जागी प्रसाद दरीपकर यांची शहर युवा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामील झाल्यानंतर दापोलीत आ. योगेश कदम समर्थकांनी आ. कदम यांना समर्थन देण्यासाठी बैठकांचा सिलसिला सुरू केला. याची थेट दखल वरीष्ठ स्तरावर घेतली असून प्रथमतः शहरातील पदाधिकारी हटविण्यास शिवसेनेने सुरवात केली आहे. युवा सेनेच्या उत्तर रत्नागिरीतील पदाधिकाऱ्यांना  देखील पदावरून हटविण्यात आले आहे. उत्तर रत्नागिरी उपजिल्हा युवा अधिकारी दर्शन महाजन (दापोली विधानसभा), जिल्हा सचिव राकेश सागवेकर ( खेड ), तालुका युवा अधिकारी मच्छिंद्र गोवळकर (खेड तालुका), शहर युवा अधिकारी प्रसाद पाटणे (खेड शहर), शहर युवा अधिकारी प्रसाद दरीपकर (दापोली शहर) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उत्तर रत्नागिरी जिल्ह्यामधील युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येतील, असे युवा सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button