
ओणी-अणुस्कुरा मार्गाची दुरवस्था झाल्याने अपघात
राजापूर : ओणी-अणुस्कुरा मार्गाची दुरवस्था झाली आहे. काही भागातील खडीकरण झाले असले तरी अजून काही भागातील दुरुस्ती न झाल्याने व पडलेले खड्डे कायम आहेत. पावसाळ्यात या मार्गाने ये-जा करणे अवघड बनले आहे. रायपाटण येथे एक – दोन ठिकाणी तर दाबलेली खडी उकरून वर आली आहे. त्यावरून दुचाकीसारखी वाहने घसरण्याचे धोके वाढले आहेत. मागील पावसाळ्याप्रमाणेच या पावसाळ्यातही हा मार्ग त्रास देणार अशीच चिन्हे आहेत.
गतवर्षी आंबा घाटातील पडझडीनंतर त्या घाटातील सर्व प्रकारची वाहतूक अणुस्कुरा मार्गे वळविण्यात आली होती. या कालावधीत मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची ये-जा या मार्गाने झाली होती. परिणामी या संपूर्ण मार्गाची चाळण झाली होती. त्यानंतर राज्य शासनाने सुमारे सात कोटी चव्वेचाळीस लाख रुपयांचा निधी या रस्त्याच्या कामासाठी मंजूर केला होता. त्याचे बॅनर परिसरात झळकले होते. मात्र संपूर्ण उन्हाळा सरला तरी या मार्गाचे काम काही पूर्ण झाले नाही. सुरुवातीला ते काम श्रेयवादात अडकले. नंतर तर ते न्यायालयात गेले आणि न्यायप्रविष्ठ झाले. रखडलेल्या ओणी – अणुस्कुरा मार्गाच्या कामासाठी 1 मे या महाराष्ट्र राज्य दिनादिवशी पाचल बाजारपेठेत परिसरवासीयांचे एक दिवशीय आंदोलनही झाले होते. त्यानंतर तोंडावर येऊन ठेपलेला पावसाळा पाहून ओणी-अणुस्कुरा मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम अखेरच्या टप्प्यात सुरू करण्यात आले. सुरुवातीला अणुस्कुरा घाटातील खड्डे बुजविले गेले. त्यानंतर पाचल, रायपाटण परिसरातील खड्डे बुजविण्याचे आणि खराब बनलेल्या मोठ्या भागाचे खडीकरणाचे काम करण्यात आले. काही भागातील काम पूर्ण झाले तर पावसाला सुरुवात झाल्याने रायपाटण, खडीकोळवण, सौंदळ अशा परिसरातील खराब झालेले रस्त्याचे मोठे भाग तसेच राहिले आहेत. तेथे पावसाचे पाणी साचून खड्डे पडायला सुरुवात झाली आहे.