कोकणातील सर्व जिल्ह्यात राबवणार कौशल्य श्रेणीवर्धन धोरण

रत्नागिरी : प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत तरूण उद्योजकांच्या कौशल्याला संधी देण्यासाठी 18 ते 45 वयोगटात कुशल मनुष्यबळाची निर्मिती करण्यासाठी कौशल्य श्रेणी वर्धन धोरण कोकणातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. हे धोरण व्यापक स्वरूपात लागू करण्यापूर्वी निवडक जिल्हा किंवा विभागीय मुख्यालयांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबवले जाणार असून, धोरणाअंतर्गत राबवले जाणारे अभ्यासक्रम स्वयंवित्तपुरवठा तत्त्वावर चालवले जाणार आहे.
राष्ट्रीय कौशल्य विकास परिषदेने (एनएसडीसी) जाहीर केलेल्या अहवालानुसार विस्तृत कौशल्य विकास उपक्रमांच्या गरजेसंदर्भात महाराष्ट्र हे दुसर्‍या क्रमांकाचे राज्य आहे. तसेच  वेगाने बदलणार्‍या तंत्रज्ञानामुळे औद्योगिक आस्थापनांना अद्ययावत कौशल्ये आत्मसात असलेल्या कर्मचार्‍यांचा पुरवठा अपुरा पडत आहे. शाश्वत स्वयंरोजगार आणि अद्ययावत कौशल्यपूर्ण रोजगारासाठी आवश्यक असणार्‍या कालसुसंगत, अद्ययावत कौशल्यवृद्धीसाठी कौशल्य श्रेणी वर्धन धोरणाची अंमबजावणी करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.
या अंतर्गत अद्ययावत कौशल्य, कौशल्य वर्धन आणि पुनर्कुशलता या तीन टप्प्यांत प्रशिक्षण दिले जाईल. या धोरणाच्या अंमलबजावणीतून नोकरी किंवा व्यवसायात गतिशीलता, उत्पन्न किंवा वेतनवाढ, रोजगाराच्या अधिक संधी,  मनुष्यबळ विकास आणि उत्पादनवृद्धीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, या योजनेत ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. योजनेसाठी प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियान या योजनेअंतर्गत मंजूर निधीच्या दहा टक्के रक्कम उपलब्ध करून दिली जाणार
आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button