
मंडणगडमध्ये शिबिराने दिव्यांगत्वाची टक्केवारी झाली कमी
मंडणगड : मे महिन्यात जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून तालुक्याच्या ठिकाणी झालेल्या दिव्यांग आरोग्य शिबिराचा तालुक्यातील जुन्या दिव्यांगांना लाभापेक्षा तोटा अधिक झाला आहे. यापूर्वी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र धारण केलेल्या काही दिव्यांगांच्या टक्केवारीचे प्रमाण कमी करण्यात आल्याने त्याचा तोटा त्यांना सहन करावा लागल्याने नाराजी आहे. कोणतीही सक्षम यंत्रणा नसताना शिबिरात करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीवर समस्याग्रस्त दिव्यांग शंका उपस्थित करू लागले आहेत. विशेषतः शासनाच्या सेवेत दाखल असलेल्या दिव्यांग कर्मचार्यांची अपंगत्वाची टक्केवारी कमी झाल्याने त्यांच्यावर आयकराचा बोजा वाढला आहे.
तालुक्याच्या ठिकाणी अपंग संस्थेसह सार्वत्रिक प्रयत्नांनी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. ते यशस्वी करण्यात आले. दिव्यांगांची तपासणी करून तेथेच प्रमाणपत्र देण्याचा दावा आयोजकांकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात शिबिराच्या ठिकाणी एकही प्रमाणपत्र वितरित केले जात नाही. प्रमाणपत्राची मागणी करणार्या दिव्यांगांना जिल्ह्याच्या ठिकाणी हेलपाटे मारावेच लागतात. निदान यावेळी तरी हा पूर्व इतिहास पुसला जाईल, अशी अपेक्षा होती.
192 दिव्यांगांची तपासणी या शिबिरात झाली होती.