
कशेडी घाटात रसायनाच्या टँकरला अपघात; एक ठार, चालक जखमी
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात २५ रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास रसायनच्या टँकरला अपघात झाला. अपघातात टँकर चालक गंभीर जखमी झाला असून टँकरमधून प्रवास करत असलेल्या अन्य एकाचा टँकरखाली चिरडून मृत्यू झाला आहे. जखमी चालकाला डेरवण येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गुजरात येथून रसायन घेऊन लोटे औद्योगिक वसाहतीत येणाऱ्या टँकर चा कशेडी आंबा पॉईंट येथे अपघात झाला.
भगवानदीप राम लखन (वय सुमारे ३५, रायबरेली, उत्तरप्रदेश) हा रसायन भरलेला टँकर (जी. जे. १२, बी.टी. ८३४७) घेऊन गुजरात येथून मुंबई-गोवा महामार्गावरून लोटे औद्योगिक वसाहतीत येत होता. २५ रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास कशेडी घाट उतरत असताना आंबा पॉईंट येथे टँकर चालकाचे नियंत्रण सुटले. यावेळी चालकाच्या बाजूला बसलेला व्यक्ती बाहेर फेकला गेला व टँकरखाली चिरडला. त्याचा जागीच मृत्यू झाला. टँकर धडकल्याने चालक देखील गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य मदतीला धावून आले.




