
मिरजोळेतील प्रस्तावित जिल्हा क्रीडा संकुल उभारणीच्या कामास गती द्या : अॅड. अनिल परब
रत्नागिरी : शहरालगत मिरजोळे येथील प्रस्तावित जिल्हा क्रीडा संकुल उभारणीच्या कामास गती मिळण्याच्या दृष्टीकोनातून लवकरात लवकर तांत्रिक बाबी पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी दिले. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत याबाबतचा आढावा पालकमंत्री अॅड. परब यांनी घेतला.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत ऑनलाईन पध्दतीने बैठकीत सहभागी झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, उपवन संरक्षक प्रियंका लगड आदिंची उपस्थिती होती. जिल्हा क्रीडा संकुलात खेळाची मैदाने 400 मीटर ट्रॅक तसेच फुटबॉल मैदान आदिंचे नियोजन आहे.
याचे अंदाजपत्रक 18 कोटी 80 लाख रुपये इतके आहे. जिल्हा क्रीडा संकुलासाठी मंजूर 15 कोटी निधीपैकी 3.45 कोटी रुपये प्राप्त झाले असून तालुका क्रीडा संकुलासाठी मंजूर 5 कोटीपैकी 1 कोटी रुपये प्राप्त आहेत. जिल्ह्यात खेळाडूंची संख्या अधिक आहे. त्यामुळे तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्राप्त 1 कोटीचा निधी जिल्हा संकुल निधीस वर्ग केला आहे. या एकूण 4 कोटी 45 लाख रुपयांतून या कामास सुरुवात करा, लागेल तसा निधी उपलब्ध करून देऊ, असे पालकमंत्री अॅड. परब यांनी सांगितले. या निधीतून काम सुरू करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. मारुती मंदिर येथील सध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलास कबड्डी मॅटस खरेदी करण्यात आल्या आहेत. तसेच 15 लाख रुपये खर्चून बास्केटबॉल कोर्टचे काम होणार आहे. या शहराच्या महत्वाच्या ठिकाणी असलेल्या संकुलाच्या रंगकामास आजच्या बैठकीस मान्यता देण्यात आली.




