
एमडी प्रकरणी केरळमधून मुख्य आरोपीला अटक
रत्नागिरी : दोन महिन्यांपूर्वी शहरातील एका लॉजवर एमडी या अमली पदार्थासह दोघांना पकडले होते. त्यातील मुख्य आरोपीला शहर पोलिसांच्या पथकाने मंगळवारी केरळमधून अटक केली. बुधवारी त्याला न्यायालयाने 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
मोहम्मद अब्दुल जासीम (वय 27, रा. केरळ) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. 1 मार्च रोजी पहाटे 4.45 वा. शहर पोलिस व डिबी पथकाने एका लॉजवर छापा टाकून सुमारे 4 लाख 95 हजार रुपयांचा 99 ग्रॅम वजनाचा एमडी हा अमली पदार्थ जप्त केला. त्यावेळी शियाद ए.के(25) आणि नजब मोईद नौफर(25,दोन्ही रा.केरळ) या दोघांना अटक करण्यात आली होती. परंतु या गुन्ह्यातील मुख्य आरोपीचा पोलिस शोध घेत होते. याप्रकरणी पोलिसांचे एक पथक केरळला रवाना करण्यात आले होते. या पथकाला मंगळवारी मुख्य आरोपी मोहम्मद जासीमला अटक करण्यात यश आले.