
गरिबांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यात रत्नागिरी जिल्हा राज्यात दुसरा
रत्नागिरी : राज्य शासन पुरस्कृत योजनेंतर्गत रमाई आणि शबरी आवास योजनेतील घरांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी 20 नोव्हेंबर 2019 ते 5 जून 2021 या कालावधीसाठी महाआवास अभियान राबविण्यात आले होते. महाआवास अभियान 2020-21 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील तब्बल 5 हजार 12 गरीब कुटुंबांना आपले हक्काचे घर मिळाले आहे. या योजनेचे राज्यस्तरावरील काम द्वितीय क्रमांकाचे ठरले आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला 5 हजार 863 प्रस्ताव पूर्ण करावयाचे होते. त्यातील पहिला हप्ता 5 हजार 842 जणांच्या बँक खात्यात सुपूर्द केले असून, 5 हजार 012 घरे बांधून झाली आहेत. 851 घरांचे कामे प्रगतीपथावर आहेत. महाआवास अभियानांतर्गत सर्व जिल्ह्यातील कामांचा आढावा घेण्यात आला. त्यात अहमदनगर जिल्ह्याने प्रथम तर रत्नागिरी जिल्ह्याने द्वितीय क्रमांक पटकावल्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले. पुरस्कार वितरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.