
वाडीबीड ते रसाळगड किल्ला रस्त्यासाठी एक कोटींचा निधी मजूर शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून निधीला मजुरी
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खेड तालुक्यातील ऐतिहासिक रसगळगडाला जोडणाऱ्या वाडीबीड ते रसाळगड या रस्त्यासाठी शासनाने १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजना २०२१-२१ या योजनेतून हा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच रसाळगड आणि दुर्गम वाडीबीड परिसरातील १८ गावे जोडली जाणार आहेत. साहजिकच या रस्त्यामुळे रसाळगडावर येणाऱ्या पर्यटकांचा प्रवास सुलभ होणार आहे.
कोकणातील पर्यटन स्थळांचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा या दृष्टिने शासन स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून २९ मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठीकीत कोकणातील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी वाडीबीड परिसरातील अतिदुर्गम गावे रसाळगडाला जोडण्यासाठी वाडीबीड ते रसाळगड हा रस्ता व्हावा अशी मागणी करून त्याबाबतचा पाठपुरावा सुरु ठेवला होता. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत प्रादेशिक पर्यटनस्थळे विकसित करण्याचा निर्णय होताच वाडीबीड ते रसाळगड या रस्त्याच्या बांधणीसाठी शासनाच्या वित्तविभागाने १ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. जिल्हाधिकारी रत्नागिरी आणि बांधकाम विभाग चिपळूण यांच्या देखरेखीखाली वाडीबीड ते रसाळगड या रस्त्याचे काम लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे.
वाडीबीड ते रसाळगड हा प्रस्तावित रस्ता झाल्यावर वाडीबीड या अतिशय दुर्गम भागातील वाडी माळदे, हुंबरी, नांदिवली, विहाळी कळंबणी खुर्द, कांदोशी अस्तान, चाटाव, धावडे, वडगाव ही गावे थेट रसाळगडाशी जोडली जाणार आहेत.
सध्यस्थितीत या अतिदुर्गम भागातुन तालुक्याच्या ठिकाणी यायचे झाल्यास आंबवली मार्गे मोठा वळसा मारून यावे लागते. यामध्ये वेळ आणि पैशांचाही अपव्यय होतो. प्रस्तावित असलेला हा वाडीबीड रसाळगड हा रस्ता झाल्यास या भागातील ग्रामस्थांना तळे-मार्गे खेड या तालुक्याच्या ठिकाणी येण्याचा जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे.
रसाळगडावरील जागृत देवस्थान झोलाई मातेची दर तीन वर्षाने मोठी जत्रा असते. या जत्रेदरम्यान परिसरातील ग्रामदेवतांच्या पालख्या गडावर येत असतात. वाडीबीड परिसरातील अतिदुर्गम अठरा गावातील पालख्या किमान पाच किलोमीटरचा जंगल तुडवून गडावर न्याव्या लागतात मात्र हा रस्ता झाल्यावर या भागातील भाविकांना पालख्या घेऊन गडावर जाणे सुलभ होणार आहे घेरा सुमारगड, कांदोशी, चकदेव मार्गे आंबवली मार्गे रसाळगडावर येणाऱ्या पर्यटकांना वाडीबीड-रसगळगड रस्त्यामुळे थेट रसाळगडावर येता येणार आहे.




