
रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील मच्छिमारी नौका सहा खलाशांसह खोल समुद्रात बेपत्ता,कोस्टगार्ड व पोलिसांकडून शोध सुरू
रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील मच्छी व्यावसायिकाची मच्छीमारी करणारी नौका चार खलाशी व दोन तांडेल घेऊन २६ ऑक्टोबर रोजी मासेमारीकरिता खोल समुद्रात गेली असून ती अद्याप परत आलेली नाही.
याबाबतची तक्रार जयगड पोलिस ठाण्यामध्ये नौका मालकाच्या पत्नीने दाखल केली आहे.
जयगड पोलिस ठाण्यात मुनताह मुहम्मद शरीफ टेमकर (वय 43, रा. जयगड) यांनी जयगड पोलिस ठाण्यामध्ये दाखल केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, त्यांच्या मालकीची नौका नवेद ही मत्सव्यवसाय आयुक्तांकडे नोंद केलेली बोट २६ ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे पहाटे ५ वाजता समुद्रात मासेमारी करण्याकरिता गेली होती.
या नौकेवर खलाशी व तांडेल दगडू गोविंद नाटेकर, गोकुळ तुकाराम नाटेकर, अनिल गोविंद आंबेकर, सुरेश धाकू कांबळे (सर्व, रा. गुहागर) तालुक्यातील साखरीआगर गावाचे रहिवासी असून दत्तात्रय सुरेश झगडे (रा. अडूर) व अमोल गोविंद जाधव (रा. मासू) असे सहाही खलाशी व तांडेल गुहागर तालुक्यातील आहेत. हे सर्वजण २६ ऑक्टोबर रोजी मच्छीमारीसाठी गेले होते.
या नौकेच्या शोधासाठी याच मालकाच्या दुसर्या बोटीच्या वायरलेसवरून खलाशांशी संपर्क साधला असता आम्ही आता दाभोळच्या उपर आहे, असे सांगितले गेले. मात्र, त्यानंतर या बोटीशी कोणताही संपर्क झालेला नाही, असे बोटमालक मुनताह मुहम्मद शरीफ टेमकर यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे. या घटनेला चार दिवस होऊन गेले असून या
बोटीचा व त्यावरील खलाशांचा कसल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. तरी या बोटीचा व त्यावरील खलाशांचा शोध घेण्यात यावा अशी विनंती या जबाबात केली आहे.
या घटनेची नोंद रत्नागिरी तालुक्यात जयगड सागरी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या नौकेचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलिस, स्थानिक मच्छिमार, कोस्टगार्ड, नौका विभाग रत्नागिरी हे घेत असून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना वायरलेसवरून या नौकेची माहिती देण्यात आली आहे
www.konkantoday.com