
दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये पंतप्रधानांचा वाढदिवसबेटी बचाओ, बेटी पढाओच्या नारा देत साजरा
रत्नागिरी- स्त्रियांचा सन्मान झाला पाहिजे, आत्मनिर्भर झाली पाहिजे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ उपक्रम सुरू केला. स्त्री हीसुद्धा देशाचे भविष्य आहे. आपले महाविद्यालय आरोग्याच्या क्षेत्रात नर्सिंगची सेवा देत आहोत. अमृतमहोत्सवात स्त्रियांना सन्मान देण्यासाठी लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला अशी इतिहासात नोंद होईल. भारतीय स्वातंत्र्याची शताब्दी साजरी होईल, त्यावेळी भारत समृद्ध, विकसित राष्ट्र असेल. पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या वाटेवरूनच भारत महासत्ता होणार आहे, असे प्रतिपादन माजी आमदार तथा फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त बाळासाहेब माने यांनी केले.
दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी बेटी बचाओ, बेटी पढाओचा नारा घुमला. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्कीटला प्रतिसाद मिळाला.
या वेळी बाळासाहेब माने म्हणाले की, व्यक्तीच्या जीवनात जन्मदिवस महत्त्वाचा असतो. पंतप्रधानांचा जन्मदिवस भविष्याच्या दृष्टीने आपण साजरा करतोय. आज एकाच दिवशी देशामध्ये २ कोटी लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झाले. एका दिवसात नर्सेस, स्टाफ आहेत त्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत लसीकरण केले. अनेक देशांची लोकसंख्या २ कोटीपेक्षा कमी आहे. परंतु भारतात हा जागतिक विक्रम घडवण्याचे काम मोदी यांनी केले.
१३५ कोटी भारतीयांचे मोफत लसीकरण करण्याचा संकल्प पंतप्रधान मोदी यांनी केला. पंतप्रधानांच्या प्रोत्साहन मिळाल्यामुळे तंत्रज्ञ, शास्त्रज्ञांनी मेहनत घेत स्वदेशी तंत्रज्ञान वापरून लस विकसित केली. ७५ कोटी नागरिकांना लस मिळाली. २० टक्के नागरिकांचे दोन डोस झाले आहेत. लवकरच अधिक गतीने लसीकरण पूर्ण होईल. अभिमानाची गोष्ट आहे. द्रष्टा, कर्तव्यकठोर पंतप्रधान लाभले. मी आमदार असताना श्री. मोदी गुजराथचे मुख्यमंत्री होते. ते रत्नागिरीत आले असता त्यांची भेट घेता आली आणि पंतप्रधान झाल्यानंतर २०१४ मध्ये प्रचार सभेमध्ये मला त्यांच्यासोबतच्या खुर्चीवर बसता आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऋषीतुल्य व्यक्तीमत्व आहे, त्यांच्यावर दैवी कृपा आहे. अनेक वर्षांनंतर असे पंतप्रधान लाभले. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारत गरुडभरारी घेत आहे. विविध क्षेत्रात बलशाली होत आहे. मोदी हे प्रधानसेवक म्हणून काम करत आहेत, असे प्रतिपादन बाळ माने यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, १५ वर्षांपूर्वी महाविद्यालय सुरू केले. आईला आरोग्यसेवा देऊ शकलो नाही, तिचे निधन झाले. अशा महिलांच्या आरोग्यसेवेत मदत करण्यात काम केले पाहिजे, कोकणातल्या मुली शिकल्या पाहिजे, स्त्रीचा सन्मान करण्याकरिता महाविद्यालय सुरू केले. आज महिला गगनभरारी घेत आहेत.
बाळ माने यांनी आवाहन केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबरपर्यंत किमान १ तास देशकार्यासाठी खर्च करावा. आपण समाजाचे देणे लागतो, या हेतूने काम करावे. रत्नागिरीतही मोठ्या प्रमाणात लसीकरणाची गरज आहे. पुढील आठवड्यात अन्य संस्थांच्या माध्यमातून लसीकरणाची मोहीम सुरू करण्याचा मानस आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री कुलये आणि हेमांगी शिंदे या विद्यार्थिनीने केले. साक्षी चव्हाण, सलोनी मोरे, विनायक गावड़े या विद्यार्थिनी उत्कृष्टरित्या आपले मनोगत व्यक्त केले. त्या नंतर तृतीय वर्ष जीएनएमच्या विद्यार्थ्यानी नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बेटी बचाओ बेटी पढ़ाओ या विषयावर पथनाट्य सादर केले.
या वेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी केक कापून पंतप्रधान मोदी यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला रजिस्ट्रार शलाका लाड, प्रा. रमेश बंडगर, प्रा. चेतन अंबुपे, अमेय भागवत, निखिल केतकर व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. हर्षाली जाधव हिने आभार मानले.