
केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांची रत्नागिरीची जनआशीर्वाद यात्रा ठरली यशस्वी….
जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी आखली होती रणनिती
रत्नागिरी– रत्नागिरीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा यशस्वी करण्यामागे द. रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांची भूमिका महत्त्वाची ठरली. भाजपची ताकद, शिवसेनेचा विरोध, राणे फॅक्टर आणि दोन दिवसांपूर्वी राणे यांना झालेली अटक, महाड न्यायालयात जामीन या सार्या घडामोडीत तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. परंतु भाजपच्या सर्व कार्यकारिणीने घेतलेल्या अचाट मेहनतीमुळे आणि राणे यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे रत्नागिरीत जन आशीर्वाद यात्रा यशस्वी झाली आणि भाजपच्या तमाम कार्यकर्त्यांना प्रचंड उर्जा मिळाली, असे म्हटले तर वावगे ठरू नये.
संगमेश्वरमधून जन आशीर्वाद यात्रा रत्नागिरीत दाखल होणार होती. परंतु अटकेमुळे ती रत्नागिरीत येऊ शकली नाही. या काळात बॅनर्स फाडणे, दगडफेक असे प्रकार घडले. रत्नागिरीत आक्रमक झालेली शिवेसना आणि भाजपचे पदाधिकारीही जशास तसे उत्तर देण्याच्या प्रयत्नात होते. परंतु पोलिसांनी हा सारा प्रकार योग्य रितीने हाताळला. त्याचप्रमाणे बदललेला दौरा, नियोजित कार्यक्रम या सार्याचा अभ्यास करून भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी रणनिती आखली. पोलिस अधिकार्यांसमवेत महत्त्वाची बैठक घेतली. रत्नागिरीच्या कार्यक्रमाला गालबोट लागणार नाही, अशा पद्धतीचे नियोजन आणि प्रत्येक पदाधिकार्यावर दिलेली जबाबदारी, ती जबाबदारी पूर्ण होतेय की नाही, याची क्षणाक्षणाला माहिती ठेवली.
दुसरे असे की अॅड. पटवर्धन हे सहकारतज्ञ असल्यामुळे सर्वपक्षीयांशी त्यांचे चांगले संबंध आणि राजकारणविरहित असणारे सर्वमान्य नेतृत्व यामुळे त्यांच्या शब्दाला वजन आहे. दौर्याच्या आदल्याच दिवशी त्यांनी शहराचा कानोसा घेतला. जन आशीर्वाद यात्रा सुरळित पार पडण्याकरिता नियोजन करत विरोधकांनाही योग्य त्या भाषेत समजावले. रत्नागिरीसारख्या सुसंस्कृत शहरात एके काळचे मित्रपक्ष असताना गालबोट लागू नये याकरिता रणनिती आखली.
जन आशीर्वाद यात्रेने आता भाजपची ताकद वाढली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे यांना मानणारा मोठा वर्ग रत्नागिरीत आहे. त्यामुळे भाजपची ताकद आता दुप्पट झाली आहे. भाजप कार्यकर्त्यांसह समाजातील सर्व स्तरांतील लोकांनी येऊन मंत्री राणे यांची भेट घेतली पाहिजे याकरिता मच्छीमार, सीए, इंडियन मेडिकल असेसिएशन, रत्नागिरी जिल्हा बार असोसिएशन (वकिल संघटना), पाटीदार समाज, भंडारी समाज, मांडवी पर्यटन संस्था, भाजप उद्योग आघाडी, महिला आघाडी यांच्यासमवेत सुमारे ३० संस्थांच्या शिष्टमंडळ, पदाधिकाऱ्यांना वेळ ठरवून दिली. भाजप कार्यालयात मंत्री राणे यांची भेट घेत या सर्व संस्थांनी निवेदन सादर केली. यामुळे मंत्री राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सर्व समावेशक ठरली. त्यामुळे जिल्हाध्यक्ष अॅड. पटवर्धन यांच्या या परफेक्ट नियोजनावर कार्यकर्ते खुष आहेत. उत्तम टीम वर्क, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे उत्तम सहकार्य याचा आविष्कार या यात्रेदरम्यान अधोरेखित झाला.