
अनिल परब यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा – भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या
परिवहन मंत्री अनिल परब यांनी दापोली येथे बेकायदेशीर रिसॉर्ट उभे केले.मी तक्रार केल्यावर प्रशासनावर दबाव टाकून शासकीय नियमांचा भंग करून ती जागा विकली. परंतु या संपूर्ण प्रक्रियेत शासनाची फसवणूक झाली असून याबद्दल अनिल परब यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. तर या प्रकरणी रत्नागिरीचे जिल्हाधिकारीही याला जबाबदार असून ही महसूल प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या तलाठी, ग्रामसेवकाला निलंबित करण्याची मागणी केली आहे.
कोरोना कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मुरुड येथे उभारलेले दहा करोडचे रिसॉर्ट हे बेकायदेशीर असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी यांची भेट घेण्यासाठी ते आज रत्नागिरी मध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.किरीट सोमय्या म्हणाले की, आपण या रिसॉर्ट विषयी तक्रार दाखल केल्यानंतर पालकमंत्री अनिल परब यांनी ग्रामपंचायतीशी पत्र व्यवहार करुन शेतजमिनीवरील रिसॉर्टसाठी बिनशेतीकर भरला. परंतु हा कर ग्रामसेवकांनी कसा काय भरुन घेतला. कागदोपत्री शेतजमिन असतानाही बिनशेतीकर कसा काय भरुन घेतला जाऊ शकतो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यात ग्रामसेवक व तलाठी या दोघांनाही निलंबीत करुन त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी आपण जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. यावर योग्य ती चौकशी करण्याचे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकार्यांनी दिले असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. या सर्व प्रकरणाला रत्नागिरीचे जिल्हाधिकारीही तेवढेच जबाबदार असल्याचाही आरोपही त्यांनी केला.
.या पत्रकार परिषदेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, शहराध्यक्ष सचिन करमरकर आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com