
आरोग्य कर्मचार्याशी हुज्जत, राजापुरात एकाविरुध्द गुन्हा दाखल
राजापूर पेंडखळे चिपटेवाडी येथे एका रुग्णाची तपासणी करण्यासाठी आरोग्य पथक गेले असता, त्या रुग्णाच्या नातेवाइकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत, त्यांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी आरोग्यसेविकेने राजापूर पोलीस स्थानकात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, प्रदीप प्रकाश खानविलकर याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.तालुक्यातील पेंडखळे हा कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखला जात आहे. याच गावातील एक व्यक्ती आजारी असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाल्यानंतर, या व्यक्तीची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक संबंधित रुग्णाच्या घरी गेले. त्यावेळी रुग्णाचा मुलगा प्रदीप खानविलकर याने आरोग्य कर्मचाऱ्यांची उद्दाम वर्तन करून रुग्णाची तपासणी करण्यास अटकाव केला, तसेच कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेले. याबाबत संबंधित आरोग्यसेविकेने राजापूर तहसीलदार यांना निवेदन दिले असून, पोलीस स्थानकातही तक्रार दाखल केली आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
www.konkantoday.com