
कोरोना काळात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कायम सेवेत नेमणूक देण्याची समविचारी मंचची मागणी
रत्नागिरीः
*माणुसकी सेवाधर्म म्हणून कोरोना काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कसलीही हमी न देता शासनाने सेवेत घेतले आहे. दुर्दैवाने यातील कुणाचे काही कमी जास्त झाले तर त्याची जबाबदारी शासनावर राहील.अशी वेळ येऊ नये पण आल्यास सरकारला महागात पडेल.आम्ही संविधानाला अनुसरून सर्व पायऱ्यांवर लढू असा इशारा महाराष्ट्र समविचारी मंचचे बाबासाहेब ढोल्ये यांनी मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
राज्यभरात रुग्णसंख्या झपाटयाने वाढत आहे.इतर साधनसामग्री खरेदीवर अफाट खर्च करणारे शासन या काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेची शाश्वती देत नाही.तुटपुंजे वेतन,कामाचे अनिर्बध तास,यातून हा कर्मचारीवर्ग मेटाकूटीला आला आहे.भविष्यात कायम नोकरी मिळेल या आशेने राबणा-या या कर्मचाऱ्यांविषयी शासनाचे सहानुभूतीपर धोरण नाही.
राज्यात अनेक ठिकाणी अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे पॉझिटीव्ह आणि निगेटीव्ह रुग्ण एकत्र ठेवत असल्याचे ऐकिवात येत आहे.काही ठिकाणी दहा कर्मचाऱ्यांचे काम एकटा कर्मचारी करीत असल्याचे दिसत आहे.
यातील महत्त्वाचे म्हणजे शासनाने पहिल्या फेरीत कोरोना लागण कमी होताच अनेक कर्मचाऱ्यांना तीन महिने सेवा करुन घेऊन कमी करण्यात आले.शासनाने गरजेनुसार वापर करुन या कर्मचाऱ्यांना वाटेला लावले.राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य सेवे अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी जाहिरात देण्यात आली.मात्र प्रवेश शुल्क भरुन परिक्षेतील गोंधळामुळे भरती झाली नाही.शासनाला कोविड काळातील कर्मचाऱ्यांविषयी सहानुभूती नसून गरजेपुरता वापर सुरु आहे.हे निषेधार्ह असून सर्व सवर्गातील या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्यावे अधिक सेवाकाळात जीवित हानीची जबाबदारी घ्यावी असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.राज्यात भरमसाठ रुग्णवाढ असूनही अजूनही पुरेसा कर्मचारी वर्ग घेण्यात आलेला नाही.
साधारणपणे आँक्टोबर 2020 मध्ये असंख्य हंगामी कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले.
हे निवेदन समविचारीचे राज्य सरचिटणीस संजय पुनसकर,,निलेश आखाडे,रघुनंदन भडेकर,आनंद विलणकर,अँड.भाग्यश्री ओझा,अँड.वर्षाताई पाठारे,राधिका जोगळेकर,जान्हवी कुलकर्णी,साधना भावे आदींनी सादर केले.
कोरोना काळात जीवाची बाजी लावून आरोग्य विभागातील सर्व सवर्गातील कर्मचारी गेले वर्षभर काम करीत आहेत.मागील फेरीत कोरोना कमी होताच अनेकांना घरी पाठवण्यात आले मात्र दुसऱ्या फेरीला अनेक कर्मचाऱ्यांना शासनाने सेवेत घेतले आहे.नोकरीची कोणतीही शाश्वती न देता या तरुण उमद्या कर्मचाऱ्यांना राबवून घेतले जात आहे.ईश्वरी माणुसकी सेवा म्हणून हे कर्मचारी कुटुंबाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून काम करीत आहेत.अशा कर्मचाऱ्यांकडून ‘या नोकरीवर मी हक्क सांगणार नाही.न्यायदानाची कुठलीही पायरी गाठणार नाही.’ लिहून घेतले जात आहे.असेच शासनाने जीवित हमीपत्र लिखित स्वरुपात द्यावे अशी मागणी समविचारीने केली आहे.
www.konkantoday.com