
जगभरातील आंबा प्रेमींना अस्सल हापूसचा आस्वाद घेता यावा यासाठी ‘ग्लोबल कोकण’चा पुढाकार,आंब्याची पहिली मुहूर्ताची पेटी लंडनला निर्यात
जगभरातील आंबा प्रेमींना अस्सल हापूसचा आस्वाद घेता यावा यासाठी ‘ग्लोबल कोकण’ने पुढाकार घेतला आहे. या वर्षीच्या हंगामातील आंब्याची पहिली मुहूर्ताची पेटी लंडनला निर्यात करण्यात आली. रत्नागिरी हापूस आंब्याच्या १ डझनाच्या २१ पेट्या लंडनमध्ये फेब्रुवारी महिन्यात दाखल झाल्या. पहिल्या १ डझनच्या पेटीला ५१ पौंड म्हणजेच भारतीय चलनानुसार ५ हजार रुपये विक्रमी दर मिळाला. तर अन्य २० डझनला प्रत्येकी ३० पौंड दर मिळाला आहे. या निमित्ताने फेब्रुवारी महिन्यात प्रथमच हापूस आंबा निर्यात करण्यात आला. जर्मनी आणि युरोपमध्येही लवकरच आंब्याची निर्यात करण्यात येणार आहे.
“कोकणातील स्वावलंबी शेतकऱ्यांना जगभरातील बाजारपेठ थेट विक्रीसाठी उपलब्ध व्हावी, देशविदेशातील नागरिकांना कोणतीही भेसळ नसलेल्या आणि संपूर्णतः नैसर्गिकरित्या पिकवलेल्या हापूस आंब्याची गोडी चाखता यावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.कोकणातील १०० शेतकऱ्यांना संघटित करून त्यांनी पिकवलेल्या हापूसचा ग्लोबल ब्रँड बाजारात आणण्यासाठी देशातील पहिला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म बनवण्यात आला आहे. याचा शुभारंभ, हापूसला जीआय मानांकन मिळवून देण्यासाठी ज्यांचे मोलाचे योगदान आहे ते माजी उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते १ मार्च २०२१रोजी दिल्ली येथे होणार आहे.” असे ‘ग्लोबल कोकण’ आणि ‘कोकण भूमी प्रतिष्ठान’चे संस्थापक संजय यादवराव यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण उपक्रमाला ‘ऍग्रीकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी’ आणि आणि ‘महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळा’चे सहकार्य लाभले आहे.
www.konkantoday.com




