
अन्याय झालेल्या एसटीतील चालक वाहकांनी भाजयुमोकडे संपर्क साधावा
रत्नागिरी, – एसटीच्या परिपत्रकानुसार दोषी आढळलेल्या चालक, वाहकांना न्यायालयाने पुन्हा कामावर घ्या, समकक्ष नोकरी द्या असे आदेश देऊनही अनेकांना रत्नागिरी विभागात नोकरीवर रुजू करून घेतलेले नाही. त्यामुळे अशा चालक, वाहकांनी भारतीय जनता युवा मोर्चाशी संपर्क साधावा. येत्या सोमवारी (ता. १४) विभाग नियंत्रकांसोबत होणार्या बैठकीमध्ये त्यांचा प्रश्न सोडवण्यात येईल, अशी ग्वाही भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी दिली.
भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली काल विभाग नियंत्रकांशी विविध प्रश्नांवर चर्चा झाली. त्यानंतर चालक, वाहकांना कामावर रुजू करून घेतले नसल्याची अनेक तक्रारी समोर आल्या. त्यावर विभाग नियंत्रकांनी त्यांचेही प्रश्न सोडवू, असे सांगितले. त्यानुसार अशा प्रकारे अन्याय झालेल्या चालक, वाहकांनी भाजयुमोशी संपर्क साधावा, असे आवाहन पटवर्धन यांनी केले.
एसटीचा कारभार महामंडळाने निर्देश दिल्याप्रमाणे होत असतो. स्वतंत्र शिक्षेची तरतूद त्यांच्या कायद्यात आहे. त्यामुळे दंड आकारणी, परजिल्ह्यात बदली, निलंबन वगैरे विविध प्रकारची कारवाई केली जाते. काही वेळा आकसापोटी कर्मचार्यांवर कारवाई केली जाते. महाविकास आघाडीमध्येही शिवसेनेकडे हे खाते आहे. कर्मचार्यांवर अन्याय केला जात आहे, अशी कामगार संघटनांचीही तक्रार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या कर्मचार्यांवर अन्याय झाला आहे अशा सर्वांनी भाजयुमोकडे संपर्क साधावा. त्यांची तक्रार जाणून घेऊन सोमवारच्या सभेत न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे अनिकेत पटवर्धन यांनी स्पष्ट केले.
www.konkantoday.com