
मुंबई गोवा महामार्गावरील बोरज टोल प्लाजाचे काम मार्च अखेर पुर्ण होणार
खेड : मुंबई गोवा महामार्गावरील बोरज ग्रामपंचायतीच्या हद्दीत उभारण्यात येत असलेल्या टोल प्लाजाचे काम ६० टक्के पुर्ण झाले असून सर्व आवश्यक सुविधांसह हा टोलप्लाजा मार्च २०२१ अखेर राष्ट्रिय महामार्ग विभागाच्या ताब्यात दिल्या जाईल अशी माहिती महामार्ग चौदपरीकरणाचे काम करणाऱ्या कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनीचे व्यवस्थापक श्रीकांत बकले यांनी दिली.
कशेडी ते पशुराम घाट या दरम्यानच्या ४४ किलोमिटर महामार्गाचे काम कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला मिळाले आहे. सुरवातीपासूनच या कंपनीने कामाचा वेग सांभाळल्याने ४४ किलोमिटरपैकी सुमारे ३० किलोमिटरचे काम पुर्णत्वास गेले आहे. तांत्रिक अडचणींमुळे काही ठिकाणचे काम रखडले आहे. मात्र मे २०२१ अखेर कशेडी ते पशुराम दरम्यानच्या ४४ किलोमिटर महामार्गाचे काम पुर्णत्वास जाईल असे कंपनीकडून सांगितले जात आहे.
चौपदरीकरणाचे काम सुरु असतानाच कंपनीने टोल प्लाजा चे काम उभारण्यास सुरवात केली आहे. युद्धपातळीवर काम सुरु ठेवल्याने काही महिन्यांमध्येच टोलप्लाजाचे काम ६० टक्के पुर्ण झाले आहे. या टोलप्लाजावर वाहनांना ये-जा करण्यासाठी प्रत्येकी ८ अशा १६ लाईन्स असणार आहेत. कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत उभारण्यात आली असून वाहतुक पोलिसांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान चौपदरीकरणाचे काम करणारे परप्रांतीय कामगार निघून गेल्याने कामामध्ये थोडी शिथिलता आली होती. मात्र निघून गेलेले कामगार आता पुन्हा परतले आहेत. त्यामुळे पाऊस थांबताच चौदपरीकरणाचे काम पुन्हा युद्धपातळीवर सुरु करण्यात येणार आहे. मार्च २०२१ अखेर टोल प्लाजाचे काम पुर्ण होताच हा टोलप्लाजा राष्ट्रिय महामार्ग विभागाकडे सुपुर्द केला जाणार आहे.
www.konkantoday.com