
सावर्डे येथील सचिन कात इंडस्ट्रीमधील चोरीप्रकरणी ऑफिसबॉयला अटक, सात लाखाचा मुद्देमाल जप्त
सावर्डे येथील सचिन कात इंडस्ट्रीमध्ये दि. १६.७.२०२० रोजी अज्ञात चोरट्याने जुन्या ऑफिसमध्ये असलेल्या तिजोरीतून सहा लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही दिवसात तपास करून या प्रकरणात या ऑफिसमध्ये काम करणार्या ऑफिसबॉय अजय दिपक मोहिते याला अटक केली. व त्याच्याकडून सहा लाखांच्या मुद्देमालासह अन्य ऐवज हस्तगत केला. ही चोरीची घटना झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांनी तात्काळ पथक तयार केले होते व त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. या पोलीस पथकाने सचिन कात इंडस्ट्रीमध्ये कामाला असलेल्या १५० कामगारांवर लक्ष केंद्रीत केले होते. दरम्याने यातील ऑफिसबॉय म्हणून काम करणार्या अजय मोहिते याची वागणूक संशयास्पद आढळून आली. पोलिसांनी याप्रकरणी त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. सदरच्या आरोपीकडे ठेवलेले सहा लाख रुपये, सॅक, टू व्हिलर मोटरसायकल, मोबाईल असा सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कामगिरी अप्पर पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक शिरीष सासने, सहा. पोलीस निरीक्षक चंद्रकांत लाड, हेड कॉन्स्टेबल संदीप कोळंबेकर, संजय कांबळे, शांताराम झोरे, नितीन डोमणे, विजय आंबेकर, सागर साळवी, दत्ता कांबळे, उत्तम सासवे यांनी पार पाडली.
www.konkantoday.com
