
भगवतीनगर, वरची निवेंडी ग्रामस्थांना‘अर्सेनिक’च्या हजार बाटल्यांचे वितरण
रत्नागिरी ः कोरोना महामारीच्या कालावधीत प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तालुक्यातील भगवतीनगर येथे अर्सेनिक अल्बम या होमिओपॅथिक गोळ्यांचे वितरण करण्यात आले. भगवतीनगरला 100 गोळ्या असलेल्या 500 बाटल्या व निवेंडी येथेही 500 बाटल्या आल्वोजन कंपनीचे जागतिक पातळीवरील संचालक (डायरेक्टर, ग्लोबल सप्लाय) व सामाजिक कार्यकर्ते डॉ. चंद्रशेखर निमकर यांनी वितरित केल्या. त्यांच्या या उपक्रमाचे दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी कौतुक केले.
भगवतीनगर, वरची निवेंडी गावात ग्रामस्थांकरिता या गोळ्या मिळाव्यात याकरिता प्रतिष्ठित ग्रामस्थ सतीश सोबळकर यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या शब्दाला मान देऊन डॉ. निमकर यांनी तत्काळ औषधाच्या एक हजार बाटल्या दिल्या. आज सकाळी शासनाच्या नियमांचे पालन करून या गोळ्यांचे वितरण करण्यात आले. या वेळी डॉ. निमकर, सतीश सोबळकर, अमोल देशपांडे, अशोक भोसले, विनायक मोहिते, संदिप शिर्के, भगवतीनगर सरपंच सौ. नुतन मायंगडे, उपसरपंच लक्ष्मण आग्रे व ग्रामसेवक श्री. पोकळे आदी हजर होते. वरची निवेंडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक हजर होते.