‘निसर्ग’च्या व्यवस्थापनाचा धडा 


निसर्ग चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकणार हे कळताच कामाला लागलेल्या प्रशासनाने पोलीस दल, आरोग्य यंत्रणा, एन.डी.आर.एफ पथके आणि ग्राम कृती दल व स्वयंसेवी संस्था संघटना यांच्या सहायाने ‘शून्य जिवीतहानी’ चे लक्ष गाठण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करुन त्यात यश मिळविले.
        आज पहाटे 5 वाजण्यापूर्वी या चक्रीवादळामुळे जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली मात्र या नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाची तयारी खुप आधी सुरु झाली होती.  यापूर्वी 2009 साली जिल्ह्यात ‘फयान’ वादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
        जिल्हाधिकारी श्री लक्ष्मीनारायण मिश्रा हे स्वत: ओरीसामधील आहेत.  त्यांना अशा आपत्तीची पूर्ण माहिती आहे.  चक्रीवादळाची सूचना प्राप्त होताच सर्व संबंधित विभागांची एकत्रित बैठक घेवून त्यांनी कामाचे नियोजन करुन दिले.  ग्रामीण भागात किनारपट्टीपासून 6 किलोमीटर पर्यंतच्या गावातील कच्च्या घरातील लोकांना स्थलांतरीत करण्यापासून प्रत्यक्ष आपत्तीत करायच्या कामाचे नियोजन झाले.
        सर्व विभाग पूर्ण क्षमतेने काम करतील व या संकटात प्राणहानी होणार नाही याची पूर्ण काळजी घेतील असे निर्देश त्यांनी दिले.  नागरिक घराबाहेर पडल्यास आपत्तीचा फटका त्यांना बसू शकतो यासाठी पूर्ण जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत संचारबंदी लावण्यात आल्याने अर्धा धोका नियंत्रणात आला.
        किनारपट्टीलगत धोकादायक भागातील लोकांसाठी दवंडी पिटणे तसेच आकाशवाणी रत्नागिरी वरुन संदेश पाठविणे व्हिडीओ आणि व्हॉटसअप सारख्या समाज माध्यमाचा वापर करुन जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचण्याचे काम प्रशासनाने केले.  माध्यमांना यातील घडामोडींचे अपडेटस सातत्याने दिले जात होते.
        जिल्ह्यात मध्यवर्ती नियंत्रण केंद्रासह सर्व तालुक्यांच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले.
        महत्वाचे असणारे स्थलांतराचे काम प्रत्यक्ष वादळाच्या आधी 24 तास पूर्वी सुरु करण्यात आले.  याचा धोका दापोली, मंडणगड आणि गुहागर तालुक्यांना अधिक होता.  येथे किनारपट्टीवरील गावांमधून 5 हजार 156 जणांचे स्थलांतर करुन त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
        प्रत्यक्ष वादळामध्ये झाडे पडणे, तारा तुटणे असे प्रकार घडले मात्र नियोजनामुळे अवघ्या 12 तासात सर्व रस्ते सुरळीत झाले.  वादळ शांत होताच एका बाजूला तलाठ्यांनी पंचनाम्याचे काम सुरु केले. वीज वितरण कंपनीने सायंकाळपूर्वी शहराचा विद्युत पुरवठादेखील सुरु केला. 
        जिल्हाधिकारी मिश्रा यांच्यासह पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी मैदानात उतरुन प्रत्यक्षपणे मदतकार्यात आपला सहभाग नोंदवला.
        मध्यवर्ती नियंत्रण कक्षात या कालावधीत 400 जणांची माहितीसाठी, मदतीसाठी कॉल केले सोबत तासातासाला माहिती संकलन सुरु होते.  सकाळ ते संध्याकाळ धावपळ करीत शून्य जिवीतहानी उद्दिष्ट गाठण्याचा हा सर्वांचा प्रयत्न आणि त्याला जिल्ह्यातील नागरिकांची मिळालेली साथ यामुळे जिल्ह्यात जनजीवन अपेक्षेपेक्षा कमी वेळात सुरळीत होणे व आपत्तीचा खरा मुकाबला याचा एक चांगला अध्याय आज लिहिला गेला.
                                                                 प्रशांत दैठणकर 

जिल्हा माहिती अधिकारी,रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button