
एसटी थांब्याची केवळ आश्वासने प्रवासी अजूनही उन्हातच
रत्नागिरी येथील मुख्य बस स्थानकाचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी स्टँडसमोरील मुख्य रस्त्यावर संघवी फर्निचरजवळ तात्पुरत्या स्वरूपात बसस्टॉप सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी सर्वच गाडया थांबत असल्यामुळे अनेक वेळा गाडीत चढण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. दीड महिन्यापूर्वी या परिसरात आणखी दोन बस स्टॉप निर्मिती करून प्रवाशांची विभागणी केली जाईल असे लोकप्रतिनिधी व एसटीच्या अधिकार्यांनी जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्षात त्याची कोणतीही अंमलबजावणी न झाल्याने या एकाच ठिकाणाहून प्रवासी गाडीत बसण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्या ठिकाणी प्रवाशांसाठी कोणतीही निवार्याची व्यवस्था नसल्याने प्रवाशांना उन्हात ताटकळत उभे रहावे लागत आहे. याशिवाय या ठिकाणी असलेल्या टपर्या व अन्य अनधिकृत बांधकामामुळे लोक रस्त्यावर येवून उभे रहात आहेत. त्यामुळे येणार्या एसटीच्या बसेस रस्त्याच्या मधोमध थांबवाव्या लागत असल्यामुळे बर्याचवेळेला या ठिकाणी ट्रॅफिक जॅम होत आहे. असे असूनही संबंधित खात्याचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांच्यात नाराजी निर्माण होत आहे.
www.konkantoday.com




