
आर्ट सर्कल संगीत महोत्सव आज 24 पासून सुरू
कोकणातील शास्त्रीय संगीताचा भव्य महोत्सव अर्थात आर्ट सर्कल आयोजित संगीत महोत्सव दि। 24 जानेवारी पासून थिबा राजवाडा येथे साकारत आहे. शुक्रवारी सायंकाळी साडे सहा वाजता होणाऱ्या
उद्घाटनाच्या दिवसाचा प्रारंभ करणार आहेत, दोन तरुण हरहुन्नरी नृत्यांगना डॉ. कनिनिका निनावे आणि पूजा भालेराव. गेली 15 वर्षाहून अधिक काळ भरतनाट्यम ची साधना गुरू संध्या पुरेचा यांच्याकडे केल्यानंतर आता नानाविध प्रयोग आपल्या नृत्यामध्ये आणण्याचा प्रयत्न या दोन गुणी कलावंत करत आहेत. अभंग आणि भरतनाट्यम या दोन भक्तीपूर्ण प्रकारांचा अपूर्व संगम घडवण्याचा त्यांनी केलेला प्रयोग वाखाणण्यासारखा आहे.
कनिनिका आणि पूजा यांच्या सादारीकरणानंतर शास्त्रीय गायन होणार आहे विदुषी श्रुती सडोलीकर काटकर यांचे.
जयपूर अत्रौली घराण्याची परंपरा पुढे नेण्याचं मौलिक कार्य श्रुतिताई करत आहेत. पंडित वामनराव सडोलीकर यांच्या करून वारसा हक्काने मिळालेल्या सुरांचा नजराणा त्यांनी अत्यन्त प्राणपणाने जपला आहे. घराण्याचे गुरू गुल्लूभाई जसदनवाला यांच्याकडे 12 वर्ष गुरु शिष्य परंपरेने त्यांनी संगीत विद्या ग्रहण केली. जसदनवाला हे या घराण्याच्या दुर्मिळ आणि अवघड रचनांच्या ज्ञानासाठी प्रसिद्ध आहेत. तसंच उस्ताद अझीझुद्दीन खान यांच्याकडून देखील त्यांनी ज्ञान ग्रहण केलं.
सध्या भातखंडे म्युझिक इन्स्टिट्यूट deemed university येथे श्रुतीजी कुलगुरु पदावर कार्यरत आहेत. संगीत नाटक अकादमी पुरस्कार, संगीत शिरोमणी पुरस्कार उच्च पुरस्कारांप्रमाणे अनेक मानाचे पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत.
या मैफिलीला तबला साथ करणार आहेत मंगेश मुळे आणि संवादिनी साथ करणार आहेत अजय जोगळेकर.
सजलेल्या थिबा राजवाड्याचं रुपडं बघायला आणि रम्य वातावरणात स्वरांचा आनंद घ्यायला रसिकांनी जरूर यावं अस आवाहन आर्ट सर्कल च्या वतीने करण्यात आले आहे