दिवा-रत्नागिरी एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एका डब्यातील संपूर्ण दिवे बंद असल्याने अंधारात प्रवास करण्याची वेळ


प्रवाशांची गैरसोय; तक्रार करूनही रेल्वे प्रशासनाकडून दखल नाही, प्रवाशाचा आरोप


रत्नागिरी : आज सायंकाळी सुटलेल्या दिवा-रत्नागिरी एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एका डब्यातील संपूर्ण दिवे बंद असल्याने अंधारात प्रवास करण्याची वेळ आल्याची तक्रार करण्यात आली आहे. दिवा स्थानकातून गाडी सुटल्यानंतर संबंधित डब्यातील दिवे सुरू नसल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले. यामुळे रात्रीच्या प्रवासात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

या संदर्भात दिवा-रत्नागिरी एक्स्प्रेसमधील प्रवासी प्रकाश नवले (कडवई, संगमेश्वर) यांनी संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून डब्यातील दिवे बंद असल्याची माहिती दिली. मात्र, फोनवरील व्यक्तीने आपले नाव सांगण्यास नकार दिल्याचे नवले यांनी सांगितले. त्यानंतर प्रतीक राणे नावाच्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक देण्यात आला.

नवले यांनी प्रतीक राणे यांच्याशी संपर्क साधून डब्यात दिवे नसल्याची माहिती दिली असता, गाडी पेन स्थानकात थांबल्यानंतर आपण संबंधित डब्यात येऊन पाहणी करतो, असे त्यांनी सांगितल्याचा दावा नवले यांनी केला. तसेच डब्यात आल्यानंतर दिव्यांची समस्या दूर झाली की नाही, याबाबत माहिती देण्याची विनंतीही करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर संबंधित व्यक्तीने संपर्क साधला नसल्याचे तसेच फोनही उचलला नसल्याचे नवले यांनी सांगितले.

दरम्यान, गाडी नागोठणे स्थानकाजवळ पोहोचली असतानाही संबंधित डब्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याचे नवले यांनी सांगितले. अंधारात गर्दीच्या डब्यात प्रवास करावा लागत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

“डब्यात गर्दी असताना दिवे बंद आहेत. अशा परिस्थितीत काही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची?” असा सवाल प्रवासी प्रकाश नवले यांनी उपस्थित केला. संबंधित क्रमांकावर पुन्हा संपर्क साधून ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर फोन कट करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

रेल्वे प्रशासनाने अशा तक्रारींची तातडीने दखल घेऊन प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने डब्यातील विद्युत व्यवस्था आणि प्रकाशयंत्रणा तत्काळ सुरळीत करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button