
देवरुखच्या वैदेही सावंत यांना ’नवदुर्गा सन्मान २०२६’ प्रदान
सामाजिक बांधिलकी जपत महिला सक्षमीकरण आणि वंचित घटकांच्या पुनर्वसनासाठी अहोरात्र धडपडणार्या देवरुखच्या रणरागिणी सौ. वैदेही प्रभावती सुधीर सावंत यांच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा मिळाला आहे. पुणे येथील ’उद्योगसखी’ या नामांकित महिला संघटनेच्या वतीने त्यांना प्रतिष्ठित ’नवदुर्गा सन्मान २०२६’ पुरस्काराने अत्यंत दिमाखात गौरविण्यात आले.
उच्चशिक्षित असलेल्या वैदेही सावंत यांनी ’चक्रभेदी सोशल फाऊंडेशन’च्या माध्यमातून सामाजिक क्रांतीची नवी मशाल पेटविली आहे. विशेषतः एकल महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांनी ठोस पावले उचलली आहेत. अनिष्ट रूढी-परंपरांना फाटा देत त्यांनी या महिलांसाठी हळदीकुंकू समारंभआयोजित करून सामाजिक सन्मान मिळवून दिला. इतकेच नव्हे, तर ८ एकल महिलांना स्वयंरोजगारासाठी मोफत टी-स्टॉल साहित्य, २०० साड्यांचे वाण, निराधार महिलांसाठी मायेचं निवारा केंद्र आणि त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या आयुष्याला नवा आधार दिला आहे.
त्यांच्या या प्रवासात वैचारिक प्रबोधनाचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्रातील पहिल्या साने गुरुजी प्राथमिक शाळेत ’शिव्यामुक्त शाळा’ संकल्प राबविणे आणि पाचेरी आगर गावात शिवीमुक्त गावाचा ठराव करणे यांसारख्या अनोख्या उपक्रमांतून त्यांनी सुसंस्कृत संवादाची नवी संस्कृती रुजविली. त्यासोबतच पर्यावरण संवर्धन आणि व्यसनमुक्तीसाठीही त्या गावोगावी निरंतर कार्यरत आहेत.




