बालकांसाठी दिलासादायक पाऊल: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठातांचा औंध ‘बालस्नेही रुग्णालयात’ अभ्यास दौरा


रत्नागिरी, दि. २३ ): जिल्ह्यातील लहान मुलांवरील उपचारांना अधिक गतिमान आणि भीतीमुक्त स्वरूप देण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी औंध (पुणे) येथील नामांकित ‘बालस्नेही रुग्णालया’ला नुकतीच सदिच्छा भेट देत अभ्यास दौरा पूर्ण केला. जिल्ह्यात येणाऱ्या बालरुग्णांना सुरक्षित, संवेदनशील आणि घरगुती वातावरणात सर्वोत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
पुण्यातील औंध येथील ‘बालस्नेही रुग्णालय’ हे लहान मुलांवरील उपचारांसाठी आणि तिथल्या बालस्नेही पायाभूत सुविधांसाठी संपूर्ण राज्यात एक आदर्श मॉडेल म्हणून ओळखले जाते. या दौऱ्यादरम्यान डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी रुग्णालयातील विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर माहिती घेतली.
रुग्णालयाविषयी मुलांच्या मनात असलेली भीती दूर करण्यासाठी करण्यात आलेली आकर्षक रंगरंगोटी, इनडोअर खेळण्याची जागा (Play Area) आणि एकूणच बालस्नेही अंतर्गत सजावट यावर त्यांनी विशेष भर दिला. यासोबतच डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांचे मुलांशी असणारे आपुलकीचे वर्तन, नवजात बालकांपासून ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठीच्या प्रगत वैद्यकीय सुविधा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘पोक्सो’ (POCSO) किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीतील संकटग्रस्त बालकांसाठी उभारण्यात आलेल्या विशेष संवेदनशील कक्षाची रचना त्यांनी बारकाईने समजून घेतली.
हा उपक्रम महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या मार्गदर्शनाखाली राबवला जात असून आयोगाच्या सदस्य मिलन जंगम यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे.
या अभ्यास दौऱ्याप्रसंगी जिल्हा रुग्णालय औंधच्या अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भाग्यश्री पाटील, डॉ. क्रांती राऊत (एम.डी. फॉरेन्सिक), मनोविकार तज्ज्ञ डॉ. लवेकर, HFCF संस्थेच्या सीईओ डॉ. कॅरोलिन डी वॉल्टर, डॉ. महादेव जाधव (HOD), व्यवस्थापक ॲड. परम आनंद, सहव्यवस्थापक वसीम शेख, व्यवस्थापक सचिन करंजुले, समुपदेशक दिप्ती पोटफोडे तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव आदी उपस्थित होते.
औंधच्या या यशस्वी मॉडेलचा अभ्यास करून लवकरच रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही अशाच प्रकारची बालस्नेही यंत्रणा कार्यान्वित करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button