
कै. उज्ज्वला भिडे स्मृती क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत सोहम रुमडे विजेता
साहस नारकरला उपविजेतेपद
रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या रत्नागिरी तालुकास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद सोहम रुमडे याने प्राप्त केले. सोहमने अत्यंत झालेल्या अटीतटीच्या अंतिम फेरीत प्रथम मानांकित सौरिश कशेळकर विरुद्धचा डाव बरोबरीत सोडवला. आयुष रायकर याने श्रीहास नारकर विरुद्धच्या डावात बाजी मारली तर साहस नारकर याने बाल बुद्धिबळपटू विहंग सावंत विरुद्धचा सामना जिंकला. सोहम , साहस , सौरिश व आयुष सर्वांचे समान पाच गुण झाले. टाय ब्रेक गुणांवर सोहम विजेता तर साहस उपविजेता ठरला. सौरिश व आयुष यांना अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. यश गोगटे पाचवा , विहंग सावंत सहावा व श्रीहास नारकर सातवा आला.
उत्तेजनार्थ पारितोषिके पुढीलप्रमाणे.
अनरेटेड प्रथम : ओम तेरसे
महिला प्रथम : मृण्मयी दांडेकर
१५ वर्षे वयोगट : नंदन दामले
१३ वर्षे वयोगट : अलिक गांगुली
११ वर्षे वयोगट : शर्वील शहाणे
०९ वर्षे वयोगट : आरव निमकर
विशेष कामगिरी : सिद्धेश मदने
स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त खेळाडूंना एकूण पंधरा हजार रुपयांची बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कै. उज्ज्वला भिडे यांचे कुटुंबीय सौरभ भिडे , विक्रम फडके यांनी ही स्पर्धा भरविण्यात मोलाचे सहकार्य केले. पारितोषिक वितरण समारंभ चार्टर्ड अकाउंटंट श्री. आदित्य फडके यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी श्री. विजय भिडे , चैतन्य भिडे , जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव विवेक सोहनी आदी मान्यवर उपस्थित होते. रत्नागिरी सारख्या ठिकाणी क्लासिकल स्पर्धा भरविल्या जात असल्याबद्दल फडके यांनी आयोजकांचे कौतुक केले. मॅजिक स्क्वेअर चेस अकॅडमी मार्फत भविष्यात देखील अश्या स्वरूपाच्या इतरही स्पर्धा भरविण्यात येतील अशी ग्वाही देण्यात आली.




