
रत्नागिरीच्या आयटीआयचा देशपातळीवर डंका!
अथर्व नागवेकर आणि श्रावणी चव्हाण यांचा युवासेनेकडून सत्कार
देशात अन् राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल मंत्री उदय सामंत, आ. किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवंतांचा गौरव

रत्नागिरी : रत्नागिरीतील ‘आयटीआय’चा देशपातळीवर गौरव वाढवणारे गुणवंत विद्यार्थी अथर्व नागवेकर आणि श्रावणी चव्हाण या दोघांचा युवासेनेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत आणि आमदार किरणजी सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी’चा प्रशिक्षणार्थी अथर्व नागवेकर याने COPA (Computer Operator and Programming Assistant) या ट्रेडमध्ये संपूर्ण भारत आणि महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून ऐतिहासिक यश संपादन केले आहे. तर दुसरीकडे, ‘राणी लक्ष्मीबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला), रत्नागिरी’ची प्रशिक्षणार्थी श्रावणी चव्हाण हिने Fruit and Vegetable Processor या ट्रेडमध्ये देशात आणि राज्यात अव्वल स्थान पटकावत रत्नागिरीची मान उंचवली आहे.
या दोन्ही गुणवंतांच्या अभूतपूर्व यशाची दखल घेत शिवसेना युवासेनेचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख तुषार साळवी आणि तालुकाप्रमुख हर्षराज पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. युवासेनेच्या रत्नागिरीतील मुख्य कार्यालयात अथर्व नागवेकर याचा सत्कार करण्यात आला, तर श्रावणी चव्हाण हिच्या घरी जाऊन तिच्या या यशाचे कौतुक करत तिला शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी मिरजोळे विभाग प्रमुख प्रथमेश पाटील, प्रशांत चाळके, नंदकुमार कुवार, अभिजित घोडके यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रत्नागिरीतील या दोन्ही विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून आणि शैक्षणिक वर्तुळातून त्यांच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




