
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध; समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू : राज्यमंत्री योगेश कदम खेड तालुक्यातील जामगे येथे ‘सेवा संकल्प अभियानां’तर्गत माजी सैनिक मेळावा उत्साहात

रत्नागिरी, दि. १९ ): माजी सैनिक, वीर नारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन, प्रशासन आणि माजी सैनिक संघटना यांच्या समन्वयातून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. सैनिकांच्या त्यागाचा आणि बलिदानाचा सन्मान राखत त्यांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायती राज, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत खेड तालुक्यातील छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूल, जामगे येथे माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात ९७ वीर नारी, वीर माता-पिता, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. अमर जवान स्मृतीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून शूर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले. प्रास्ताविकात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रविंद बिरादार यांनी सेवा संकल्प अभियानाचा हेतू स्पष्ट करत कल्याणकारी योजनांची माहिती दिली.
कल्याणकारी निधीत दुप्पट वाढ; वसतिगृह व कॅन्टीनसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
याप्रसंगी राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते वीर नारी व वीर माता-पित्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला, तसेच दोन माजी सैनिकांना आर्थिक मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना राज्यमंत्री योगेश कदम यांनी महत्त्वाच्या बाबी मांडल्या:
- निधीत दुप्पट वाढ: शासनाच्या कल्याणकारी निधीअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत दुप्पट वाढ करण्यात आली आहे.
- अग्निवीरांना आरक्षण: अग्निवीरांना राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय सेवांमधील गणवेशधारी गट-क संवर्गात १० टक्के समांतर आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
- केंद्रीय सैनिक बोर्डाचे लाभ: माजी सैनिकांच्या मुलींच्या विवाहासाठी आणि निवृत्तीवेतन नसलेल्या माजी सैनिकांच्या चरितार्थासाठी दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत दुप्पट वाढ झाली असून, दर तीन महिन्यांनी या योजनांचा आढावा घेण्यात येईल.
- खेड येथे वसतिगृह व सुविधा: खेड तालुक्यातील माजी सैनिकांसाठी राखीव जागा त्यांच्या कल्याणासाठीच वापरली जाईल. येथे वसतिगृह आणि कॅन्टीनची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सविस्तर अंदाजपत्रक व प्रस्ताव सादर करावा.
- जमीन प्रश्न निवारण: युद्धविधवांच्या जमिनींसंदर्भातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
सैनिकांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन अधिकाधिक तरुणांनी सैन्यदलात भरती होऊन देशसेवेसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशासकीय कल्याण संघटक सुनील कदम यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्याधर ताटे यांनी केले. सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या ‘वंदे मातरम्’ गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.




