
‘गोकुळ’ सतेज पाटीलांकडून सर; समविचारी आघाडीची दिवाळी; महायुतीचे पानिपत!
कोल्हापूर : कोल्हापूरच्या सहकार सम्राज्यातील सर्वात प्रतिष्ठेचा किल्ला अर्थात गोकुळ दूध संघ अखेर काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी सर केला. राजकीय प्रतिष्ठेच्या पणाला लागलेल्या या महासंग्रामात सोमवारी विरोधी राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने २५ पैकी तब्बल १६ जागांवर विजयाचे सोने लुटले. महायुती प्रणित सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीला अवघ्या ९ जागांवरच समाधान मानावे लागले आहे.
राज्यातील सहकार तत्वावरील सर्वात मोठ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक राज्यातील महायुतीने प्रतिष्ठेची केली होती. मुख्यमंत्र्यांपासून ते जिल्ह्यातील महायुतीच्या तमाम नेत्यांनी प्रचाराची राळ उठवली होती. तर विरोधात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी एक हाती प्रचार यंत्रणा राबवली होती. आज मतमोजणीत सकाळी ११ वाजता ५ हजार ४१४ मतांपैकी पहिल्या १६५० मतांमध्ये महायुतीने आघाडी घेतली होती.
दिग्गजांना धोबीपछाड
मात्र दुपारनंतर पडदा सरकला आणि समविचारी आघाडीने अशी काही मुसंडी मारली. हातकणंगले, शिरोळ, पन्हाळ्याच्या पट्ट्यातून एकमुखी कौल मिळत गेला. या निकालातील सर्वात मोठा धक्का म्हणजे गोकुळचे विद्यमान साम्राज्य हलवणारे महायुतीचे शिलेदार मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव, मावळते अध्यक्ष नविद मुश्रीफ यांना ओबीसी गटातून समविचारीचे शशिकांत खोत यांनी ६९ मतांनी लोळवले. तर त्यांच्यासह गोकुळचे अरुण डोंगळे, विश्वास पाटील या माजी अध्यक्षांना पराभवाची धूळ चाखावी लागली. गतवेळी विरोधी गटाचा गटाची जबाबदारी एक हाती पेलणाऱ्या शौमिका महाडिक यांचा अवघ्या ७ मतांनी झालेला नाट्यमय पराभव हा या निवडणुकीचा टर्निंग पॉईंट ठरला.
ना अंगारा.. ना भंडारा
गोकुळच्या निवडणुकीत मतदान एकनिष्ठ राहावे मतदाराने एकनिष्ठ राहावे यासाठी यल्लमा रेणुका बाळूमामा हालसिद्धनाथ अशा देवतांच्या शब्दा घालण्यात आल्या होत्या. भंडाऱ्याची राख, देवाच्या शपथा आणि जाडजुड पाकिटासह सहलींच्या मोहाला न भुलता ठरावधारकांनी स्वाभिमानाचा दणका दिल्याचे दिसून आहे.
विजयाचा जल्लोष
निकालाचे पडघम वाजताच विरोधातील नेत्यांचे चेहरे हिरमुसले होते. तर दुसरीकडेसतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा या जनसंपर्क कार्यालयावर जणू दसऱ्यापूर्वीच दिवाळी अवतरली. हजारो शेतकरी, दूध उत्पादक आणि तरुण कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात सतेज पाटलांना खांद्यावर घेतले. गुलालाची मुक्त उधळण, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ठरावधारकांनी ‘गोकुळचा बाप शेतकरी हाय’, ‘कैवारी बंटी साहेब, ‘गोकुळ वाचला’च्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. फेरमतमोजणीचे नाट्य आवरल्यानंतर हा जल्लोष शिगेला पोहोचला. आता गोकुळच्या दूधगंगेतून सत्तांतराचा नवा प्रवाह वाहणार हे निकालाने स्पष्ट झाले आहे.
राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे विजयी उमेदवार
शशिकांत पाटील चुयेकर,
बाबासाहेब श्रीपती चौगुले,
अभिजित प्रभाकर तायशेटे,
किसन बापूसो चौगुले,
राहुल बजरंग देसाई,
बाबासाहेब विष्णू देवकर,
विश्वजित दिनकरराव जाधव,
विद्याधर बाबूराव गुरबे,
सचिन दौलतराव घोरपडे,
अंजना केदारी रेडेकर,
भाग्यश्री धीरज डोंगळे,
शशिकांत शामराव खोत,
राजू जयवंतराव आवळे,
बयाजी देवू शेळके.
महायुतीच्या राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचे विजयी उमेदवार याप्रमाणे :
राजेश नरसिंगराव पाटील,
राहुल पी. पाटील,
रणजित के. पाटील,
रणजित दिलीप पाटील,
अंबरिशसिंह संजय घाटगे,
चेतन अरुण नरके,
अजित शशिकांत नरके,
अजित पांडुरंग पाटील,
वीरेंद्र संजय मंडलिक




