
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर हल्ला करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी राजस्थानच्या कोटामधून केली अटक
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर हल्ला करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी राजस्थानच्या कोटामधून अटक केली आहे. कोटाच्या रेल्वे कॉलनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एजीटीएफ राजस्थान आणि कोटा शहर पोलिसांनी आरोपींना अटक केली.आरोपी दिल्लीत पोहोचल्यानंचर हरियाणात लपण्याच्या प्रयत्नात होते. तिथून नेपाळला पळण्याचा त्यांचा कट होतापण त्याआधीच पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक अल्पवयीन आहे. दुसऱ्या आरोपीचं नाव रितिक कुमार ऊर्फ रोशन आहे. तो बिहारच्या बेगुसरायचा रहिवासी आहे. तिसरा आरोपी सोनीपताचा आहे. रेहान असं त्याचं नाव आहे. आरोपींना कोटामधून अटक करण्यात आली. कोटा मुंबईपासून जवळपास ९२७ किलोमीटर दूर आहे. रस्ते मार्गानं हे अंतर कापण्यास जवळपास १५ तास २२ मिनिटं लागतात. आरोपी पुणे-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमधून प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर कोटामधून आरोपींना अटक करण्यात आली.
मुंबईच्या जुहूमध्ये टायगर श्रॉफवर गोळीबार करून पळून गेलेल्या तीन आरोपींना राजस्थानच्या कोटामधून अटक करण्यात आली. कोटाच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांकडून सूचना मिळताच डीएसपी आणि सायबर सेलनं केवळ १५ मिनिटांत सापळा रचला आणि संपूर्ण ट्रेनची झाडाझडती घेत तिघांना पकडलं. तिन्ही आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात होते.
पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहान (सोनीपत), ऋतिक ऊर्फ रोशन (बिहार) आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. त्यांच्याकडे कोणतंही शस्त्र सापडलं नाही. त्यांनी शस्त्रांचं काय केलं या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आरोपींची चौकशी केली जाईल. गोळीबार होताच तिघांनी घटनास्थळावरून पळ काढला. दिल्लीमार्गे ते नेपाळला पळण्याच्या प्रयत्नात होते.
कोटा पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीनपैकी रेहान हा मुख्य आरोपी आहे. तो अनिल पंडितच्या संपर्कात होता. त्यानंच संपूर्ण कट रचला होता. याबद्दलचे इनपुट मुंबई पोलिसांनी दिले होते. आता आम्ही आरोपींना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देऊ. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई होईल.




