
भारताच्या शीतल देवीने घडवला इतिहास! दोन्ही हात नसतानाही पायांनी तिरंदाजी करत वर्ल्ड रेकॉर्डशी साधली बरोबरी!
Sheetal Devi Asian Para Games Archery : भारतीय पॅरा तिरंदाज शीतल देवीने आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी करत इतिहास घडवला आहे. महिलांच्या कंपाउंड तिरंदाजीच्या रँकिंग फेरीत शीतलने ७०४ गुणांची कमाई करत जागतिक विक्रमाची बरोबरी केली. या कामगिरीसह तुर्कीच्या ओझनूर क्युरसोबत ती संयुक्तपणे जागतिक विक्रमाची मानकरी ठरली आहे.
याव्यतिरिक्त, शीतल देवीने यावर्षी मार्च महिन्यात बँकॉक, थायलंड येथे ६९८ गुणांसह प्रस्थापित केलेला स्वतःचाच आशियाई विक्रम मोडत यावेळी सहा गुणांनी सुधारला आहे. शीतलने पात्रता फेरीच्या दोन्ही सत्रांत प्रत्येकी ३५२ गुण मिळवले. याशिवाय, ३२ ‘X’ आणि २५ ‘१०’ गुण नोंदवत तिने अव्वल स्थान पटकावल, जे भारताच्या मोहिमेची एक दमदार सुरुवात ठरली. या कामगिरीसह तिने आशियाई क्रीडा स्पर्धेत नवा विक्रमही प्रस्थापित केला; तिने २०२३ मध्ये हांगझोऊ येथे नोंदवलेल्या ६८० गुणांच्या आपल्याच आधीच्या विक्रमाला मागे टाकलं.
ऑगस्ट २०२४ मध्ये ग्रेट ब्रिटनच्या फोबी पॅटरसन पाइनने ६९८ गुणांची कमाई करत विश्वविक्रम केला होता. पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये शीतल देवीने ७०३ गुण मिळवत हा विक्रम मोडला. मात्र, तुर्कीच्या ओझनूर क्युरे गिरडीने ७०४ गुणांची कमाई करत पुन्हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला.
Signed, sealed, delivered.
India’s archery star Sheetal Devi begins her road to #AichiNagoya2026 glory in style. #AsianParaGames #AsianParalympic pic.twitter.com/zHKuaDjmxv
— Asian Paralympic Committee (@asianparalympic) October 19, 2026
एका दुर्मीळ जन्मजात व्याधीमुळे शीतल देवीचा जन्म दोन्ही हातांशिवाय झाला. मात्र, तिने आपल्या शारीरिक मर्यादांवर मात करत तिरंदाजीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ती पायाने धनुष्य पकडते, तर खांदा, जबडा आणि पायांच्या मदतीने बाणाची दिशा निश्चित करून लक्ष्यावर बाण सोडते. तिच्या या अनोख्या तंत्रामुळे तिने जागतिक स्तरावर उल्लेखनीय यश मिळवले आहे.
शीतल देवीची आतापर्यंतची कारकीर्द उल्लेखनीय ठरली आहे. २०२२ मध्ये चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत तिने दोन सुवर्णपदकं आणि एक रौप्यपदक जिंकलं होतं. त्यानंतर २०२५ मध्ये महिलांच्या वैयक्तिक कंपाउंड प्रकारात विश्वविजेतेपद पटकावत तिने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.




