
फनी चक्रीवादळ बंगालला धडकले; वेग झाला कमी
भुवनेश्वर :-(पीटीआय):-विनाशकारी ‘फानी’ चक्रीवादळाने शुक्रवारी ओडिशाच्या सागरी किनारपट्टीला धडक दिली. ताशी 225 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पाऊस या निसर्गाच्या तांडवामुळे हाहाकार उडाला आहे. रात्री आठच्या सुमारास या चक्रीवादळाने पं. बंगालला धडक दिली.*
*या तडाख्याने आठ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात असले तरी अधिकृत सूत्रांनी तिघा जणांचा बळी गेल्याचे म्हटले आहे. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. मुसळधार पावसामुळे रेल्वे, रस्ते वाहतूक बंद पडली. विमानसेवाही बंद झाली. वीज आणि दूरसंचार यंत्रणा कोलमडली. जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुरीसह राज्यातील 14 जिल्ह्यांना याचा फटका बसला. यात प्रामुख्याने भुवनेश्वर, गजपती, केंद्रपारा आणि जगतपूरसिंह या जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.*
*‘फानी’ चक्रीवादळाने शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ओडिशाच्या किनारपट्टीला धडक दिली. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार त्याचे मुख्य केंद्र अंदाजे 25 किलोमीटरचे होते. यामुळेच सुरुवातीला 150 ते 175 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. अर्ध्या तासातच वादळाची तीव्रता वाढून ती ताशी 225 किलोमीटरपर्यंत पोहोचली.*
*या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका पुरी जिल्ह्याला बसला असला तरी राजधानी भुवनेश्वरही वादळात सापडले. तेथेही ताशी 140 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. या वादळी वार्यामुळे अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावरच झाडे पडली, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. रस्ते रिकामे करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या चक्रीवादळात सहा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, मदत आणि पुनर्वसन : आयुक्त विष्णुपाद सेठी यांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या केवळ तीन आहे. मदत केंद्रात आश्रय घेतलेल्या एका वृद्धेचा हृदयविकाराने मृत्यू झाला, तर आणखी एका घटनेत चक्रीवादळ आलेले असतानाही एक व्यक्ती घराबाहेर पडली. अंगावर झाड कोसळून त्याचा मृत्यू झाला. याशिवाय इमारतीचा काही भाग कोसळल्याने एक महिला ढिगार्याखाली सापडून मरण पावली. या वादळामुळे दळणवळण यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाली. रस्ते आणि रेल्वे वाहतूक अगोदरच थांबविण्यात आली आहे. विमानसेवाही बंद होती. दूरसंचार यंत्रणाही पूर्णपणे कोलमडली, त्यामुळे दळणवळण पूर्णपणे ठप्प झाले. वीजपुरवठाही बंद होता. दरम्यान, भुवनेश्वर, बेरहामपूर, बालूगावमध्ये ‘फानी’चा सगळ्यात जास्त प्रभाव पडला आहे. पुरीसोबतच किनारपट्टीच्या अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. ‘फानी’च्या प्रभावामुळे आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणमध्येही जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे. वादळामुळे ओडिशातील 14 जिल्ह्यांत त्याचा परिणाम दिसला. यात पुरी, जगतसिंहपूर, केंद्रपाडा, बालासोर, भद्रक, गंजम, खुर्दा, जाजपूर, नयागड, कटक, गाजापटी, मयूरभंज, ढेंकानाल आणि कियोंझरचा समावेश आहे. या जिल्ह्यातील अंदाजे 10 हजार गावे वादळामुळे प्रभावित झाली. हे वादळ ओडिशानंतर पश्चिम बंगालच्या दिशेने घोंगावले. याचा फटका आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या उत्तर-पूर्व भागातही जाणवला.
या वादळाची माहिती मिळाल्यापासून संबंधित राज्य सरकारांच्या मी संपर्कात आहे. कालही मी आढावा बैठक घेतली. या सरकारांना 1000 कोटींहून अधिक रुपये मदत देण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती दल, सीमा सुरक्षा दल, लष्कर, हवाई दल हे स्थानिक प्रशासनासोबत काम करत आहेत. चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या जनतेसोबत संपूर्ण राष्ट्र आणि केंद्र सरकार उभे आहे. :-नरेंद्र मोदी, पंतप्रधान