
पटवर्धन हायस्कूलमध्ये जलसेवा संकल्प अभियानांतर्गत चित्रकला व निबंध स्पर्धांचे बक्षीस वितरण
रत्नागिरी
: ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’ या संकल्पनेवर आधारित जलसेवा संकल्प अभियानांतर्गत रत्नागिरी पाटबंधारे मंडळ आणि पटवर्धन हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑक्टोबर रोजी चित्रकला व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये पटवर्धन हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ १६ ऑक्टोबर रोजी पटवर्धन हायस्कूलमध्ये उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी विवेक घाटविलकर, अभियंता प्रशांत जोशी तसेच भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाहक धनेश रायकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे शिक्षक कौस्तुभ पालकर यांनी केले, तर प्रशालेच्या मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
चित्रकला व निबंध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून काम पाहणाऱ्या मुग्धा पाध्ये, श्रद्धा बोडेकर, श्रद्धा हर्डीकर आणि गौरी गांधी यांचा, तसेच स्पर्धांच्या आयोजनासाठी सहकार्य करणारे कैलास वाडकर व अजित मुळीक यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर यांनी विद्यार्थ्यांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून देत जलसंवर्धनाबाबत मार्गदर्शन केले. पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी विवेक घाटविलकर यांनी सध्याच्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा काटकसरीने वापर करणे किती आवश्यक आहे, हे विद्यार्थ्यांना ओघवत्या शैलीत समजावून सांगितले. भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाहक धनेश रायकर यांनी विद्यार्थ्यांना पाणी बचतीची शपथ दिली.
पाण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे, जलसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि पाणी बचतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
या कार्यक्रमाला प्रशालेचे उपमुख्याध्यापक रुपेश पंगेरकर आणि शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा बोडेकर यांनी केले, तर नेहा तेंडुलकर यांनी आभार प्रदर्शन केले.




