
संजय राऊत, निखिल वागळेंना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस! “आधी न्यायव्यवस्थेवर टीका करायची आणि मगनिखिल वागळे अन् संजय राऊतांकडून अखेर माफी___ सरन्यायाधीशांविषयी आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य करणे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांना चांगलंच महागात पडलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं या दोघांविरोधात ‘फौजदारी अवमानने’ची कारवाई का केली जाऊ नये, असे म्हणत थेट कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जोयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने ‘सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन’ने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला. मात्र, न्यायालयाने या सुनावणीदरम्यान निखिल वागळे आणि संजय राऊत यांना वैयक्तिक उपस्थितीतून सूट दिली आहे. ‘इंडिया टूडे, लाइव्ह लॉ’नं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
प्रकरण नक्की काय आहे?
विरोधकांच्या शिष्टमंडळाला भेटण्यास सरन्यायाधीशांनी नकार दिला होता. या घटनेनंतर पत्रकार निखिल वागळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून आक्षेपार्ह भाषा वापरत पोस्ट केली होती.
तर दुसऱ्या बाजूला, खासदार संजय राऊत यांनी ‘एसआयआर’ प्रकरणावरून सरन्यायाधीशांवर निशाणा साधला होता. “न्यायाधीश सत्ताधारी पक्षाच्या राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावतात आणि मुख्यमंत्र्यांच्या मेजवानीला जातात,” तसेच लंडनमध्ये न्यायाधीश राजकीय व्यक्तींसोबत बॅडमिंटन खेळत असल्याचा दावाही त्यांनी केला होता.
निखिल वागळे अन् संजय राऊतांकडून अखेर माफी
सर्वोच्च न्यायालयाच्या कारवाई आधीच या दोघांनीही माघार घेतली आहे. निखिल वागळे यांनी कालच सोशल मीडियावरून आपल्या वादग्रस्त पोस्टबद्दल बिनशर्त माफी मागितली. “ती माझी भावनिक प्रतिक्रिया होती, मी ती पोस्ट डिलीट केली आहे,” असे वागळे यांनी स्पष्ट केले.
दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांनीही ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आपल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला. “माझ्या विधानामुळे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाला आहे अशी भावना निर्माण झाली असेल, तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी मागतो,” असे वक्तव्य राऊत यांनी केले आहे. आता सर्वोच्च न्यायालय यांच्या या माफीनाम्यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरन्यायाधीश सूर्य कांत काय म्हणाले?
“लोक नेहमी न्यायव्यवस्थेवर जाहीरपणे टीका करतात, संस्था बदनाम करण्याचा प्रयत्न करतात; पण जेव्हा त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा आणि मूलभूत हक्कांचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा मात्र संरक्षणासाठी न्यायालयाचेच दरवाजे ठोठावतात,” अशा शब्दांत सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी आपला संताप व्यक्त केला. खासदार संजय राऊत आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्याविरोधात दाखल झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानता याचिकेवरील सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी हे भाष्य केले. “आधी न्यायव्यवस्थेवर टीका करायची आणि मग वैयक्तिक स्वातंत्र्याच्या क्षणासाठी आमच्याकडे यायचं” असंही सरन्यायाधीश यावेळी म्हणाले.
“लोकांना काय चाललंय हेच समजत नाही”
सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी खंत व्यक्त करत सांगितले, “लोकांना प्रत्यक्षात काय घडत आहे हे समजत नाही. लोक जेव्हा न्यायव्यवस्थेला अशा प्रकारे दूषणे देतात, तेव्हा समाजावर त्याचा खूप वाईट परिणाम होतो. आम्हाला आशा आहे की लोकांमध्ये सुबुद्धी येईल.”




