
आमदार शेखर निकम यांचा पाठपुरावा, पिंपळी खुर्दच्या शासकीय शासकीय मत्स्यबीज केंद्रासाठी मंत्री विखे पाटलांचे सकारात्मक निर्देश
चिपळण तालुक्यातील पिंपळी खुर्द येथे शासकीय मत्स्यबीज केंद्र उभारणीच्या प्रक्रियेला गती मिळण्याची चिन्हे आहेत. या केंद्रासाठी प्रस्तावित असलेली जागा महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांच्या अखत्यारीत असल्याने, ती मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरित करण्यात यावी, अशी आग्रही विनंती आमदार शेखर निकम यांनी केली होती.
या मागणीच्या अनुषंगाने त्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती. आमदार शेखर निकम यांच्या विनंतीची दखल घेत मंत्री ना. विखे-पाटील यांनी संबंधित पत्रावर सकारात्मक शेरा नोंदविला असून, कृष्णा खोरे विकास महामंडळाची जागा मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबत पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्य अभियंत्यांना दिले आहेत. त्यामुळे पिंपळी खुर्द येथील शासकीय मत्स्यबीज केंद्राच्या उभारणीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.




