
साफयीस्टच्या निवृत्त कामगारांच्या ग्रॅच्युइटीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विनायक राऊत सरसावले
चार दिवसांची ग्रॅच्युइटी थकीत असल्याची कामगारांची तक्रार; कागदपत्रांची पडताळणी करून न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन
चिपळूण : गाणे-खडपोली येथील साफयीस्ट कंपनी प्रा. लि.च्या निवृत्त कामगारांच्या ग्रॅच्युइटीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी पुढाकार घेतला आहे. करारानुसार मिळणे अपेक्षित असलेल्या ग्रॅच्युइटीच्या रकमेपैकी चार दिवसांची रक्कम अद्याप मिळाली नसल्याची तक्रार निवृत्त कामगारांनी त्यांच्याकडे केली. या प्रकरणात लक्ष घालून आवश्यक कार्यवाहीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन राऊत यांनी दिले.
नवरात्रोत्सवानिमित्त खडपोली येथे आलेल्या विनायक राऊत यांची निवृत्त कामगारांनी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. कंपनीच्या सुरुवातीपासून, म्हणजे १९८२ पासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवृत्त करण्यात आले. त्यानंतर ग्रॅच्युइटीची रक्कम दोन टप्प्यांत देण्यात आली; मात्र या रकमेच्या हिशोबात विसंगती असल्याचा दावा कामगारांनी केला आहे.
कामगारांच्या निवेदनानुसार, कराराप्रमाणे २० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना ३० दिवसांची ग्रॅच्युइटी मिळणे अपेक्षित आहे. त्यानुसार मुंबई येथील मुख्य कार्यालयाकडून २५ दिवसांची, तर गाणे-खडपोली कार्यालयाकडून उर्वरित पाच दिवसांची रक्कम देण्यात आली. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील रकमेचा स्पष्ट लेखी हिशोब देण्यात आलेला नसून प्रत्यक्षात चार दिवसांची रक्कम थकीत असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.
या प्रश्नाबाबत कामगारांनी कंपनीशी पत्रव्यवहार केला असून, रत्नागिरी येथील कामगार आयुक्तांकडेही दाद मागितली आहे. मात्र, अद्याप समझोत्यातून तोडगा निघाला नसल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
युवासेनेनेही घेतली तक्रारीची दखल
या प्रकरणी निवृत्त कामगारांनी यापूर्वी युवासेना पोर्टलवर तक्रार नोंदवली होती. त्यानंतर युवासेना शहरप्रमुख सचिन उर्फ भैय्या कदम, युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे आणि युवासेना उपशहर अधिकारी आकाश कदम यांनी कामगारांची भेट घेऊन त्यांची समस्या जाणून घेतली. संबंधित कागदपत्रे आणि कंपनीसोबतच्या कराराची पडताळणी करून या प्रकरणावर चर्चा करण्यात आली.
निवृत्त कामगारांच्या आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित असलेल्या या प्रश्नात कंपनीने देयकांचा सविस्तर लेखी हिशोब द्यावा आणि तक्रारीचे पारदर्शक निराकरण करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. करारानुसार प्रत्यक्षात किती रक्कम देय आहे, याची कागदपत्रांच्या आधारे पडताळणी करून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे आश्वासन विनायक राऊत यांनी दिले.
यावेळी जिल्हा समन्वयक तथा उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव उर्फ बाळा कदम, तालुकाप्रमुख बळीराम गुजर, शहरप्रमुख सचिन उर्फ भैय्या कदम, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे, युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, शहर सचिव प्रशांत मुळ्ये आणि उपतालुकाप्रमुख सचिन शेट्ये आदी उपस्थित होते.




